ठाणे: केवळ खारफुटी किंवा कांदळवनाचे संरक्षण करणे एवढाच आमचा उद्देश नसून एकूणच सागरी किनाऱ्यावरील जैवविविधता टिकवून ठेवणे आणि किनाऱ्यावरील लोकांच्या जीवनमानात आमूलाग्र बदल घडवून आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. यासाठी १२५ कोटी रुपयांची सुरुवातीची तरतूद करण्यात आली असून ती भविष्यात वाढविण्यात येईल असे वनेमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज सांगितले.
ऐरोलीच्या सेक्टर १० मधील किनारपट्टी आणि सागरी जैवविविधता केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी खासदार राजन विचारे, सचिव विकास खारगे, तसेच इतर मान्यवरांची उपस्थिती होती. प्रारंभी पारंपरिक वेशभूषेतील कोळ्यांनी गाणी गात वनमंत्री तसेच इतर पाहुण्यांना व्यासपीठवर आणले. वनमंत्र्यांच्या हस्ते सुरुवातीला ॲक्टिव्हीटी सेंटर तसेच इन्फॉर्मेशन सेंटरचे फित कापून उदघाटन करण्यात आले.
आपल्या भाषणात वने मंत्री म्हणाले की आपल्याला ७२० किमीचा समुद्रकिनारा लाभला आहे. प्रचंड आधी सागर संपत्ती आपल्याकडे आहे पण याविषयीची माहिती आणि ज्ञान आपल्याला नाही. ही जैवविविधता टिकविणे आणि पुढच्या पिढीला ती माहीत करून देणे आपले कर्तव्य आहे. खाडीकिनारी राहणारे लोक अनेक मार्गाने रोजी रोटी कमवतात त्यांच्या जीवनमानात सुधारणा करणे आणि ती वर किंवा खारफुटी त्यांची शत्रू नाही तर तिचे संवर्धन करणे गरजेचे आहे हे सांगण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. १ मे महाराष्ट्र दिनी येथे विद्यार्थ्यांच्या सहली येतील तेव्हा त्यांच्याकडून शुल्क आकारू नका, असेही त्यांनी सुचविले.
जैवविविधतेचे सूंदर दर्शन घडविण्यासाठी नौकाविहाराची सोयही करण्यात आली आहे. सुमारे लाखभर पक्ष्यांचे आश्रयस्थान असलेला ठाणे खाडी परिसर राज्य सरकारने ‘फ्लेमिंगो अभयारण्य’ म्हणून यापूर्वीच जाहीर केला आहे. त्यामुळे फ्लेमिंगो तसेच इतर विविध पक्षी पाहण्याची संधीही मिळणार आहे. दिवा नगर रोड, डीएव्ही पब्लिक स्कूलजवळ, ऐरोली सेक्टर १० येथे हे केंद्र आहे.
२०१४ पासून जर्मनीतील जीआयझेड कंपनीच्या सहकार्याने सागरी आणि किनारपट्टी संरक्षित परिसराचे शाश्वत व्यवस्थापन करणारा प्रकल्प देशातील काही किनारी राज्यात सुरु आहे. त्याचाच एक भाग म्हणून वनविभागाच्या कांदळवन कक्षातर्फे हे केंद्र उभारण्यात आले आहे. याठिकाणी नौकाविहार, पक्षीनिरीक्षण करण्याची सुविधा असूनजैवविविधतेची माहिती आकर्षक पद्धतीने देण्यात येणार आहे असे अतिरिक्त प्रधान मुख्य वनसंरक्षक एन वासुदेवन यांनी सांगितले. याठिकाणी केंद्रात खाडीकिनारी असलेल्या पक्ष्यांची माहिती, चित्रे एवढेच नाही तर दृकश्राव्य माध्यमातून त्यांच्या चित्रफिती, त्यांचा आवाज ऐकता येणार आहे. वनविभागातर्फे बोटीने खाडी फिरण्याचा आनंद घेता येईल.