मुंबई : नव्या महाराष्ट्राची उभारणी करण्याचे प्रयत्न गतिमान झाले आहेत. सरकार राबवित असलेल्या जनहिताच्या विविध कार्यक्रमांचे सुयोग्य परिणाम दिसू लागले आहेत. शेती आणि ग्रामविकासाला आमचा अग्रक्रम असून त्यासाठी सरकार करीत असलेल्या प्रयत्नांना सर्व समाजघटकांनी साथ द्यावी, असे आवाहन करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील जनतेला महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
मुख्यमंत्री आपल्या संदेशात म्हणतात, यंदाच्या महाराष्ट्र दिन अनेक क्षेत्रातील दमदार पायाभरणीसह विविध क्षेत्रातील उपलब्धी प्राप्त करणारा आहे. सध्या महाराष्ट्राने विविध क्षेत्रात करावयाच्या प्रगतीसाठी टेकऑफ घेतले असून विशेषत: कृषी क्षेत्राच्या शाश्वत विकासासाठी आमचे प्रयत्न अधिक वेगवान झाले आहेत. सध्या कृषि क्षेत्र एका वैशिष्ट्यपूर्ण टर्न अराऊंडच्या स्थितीत असून गेल्या दोन वर्षातील विविध उपाययोजनांमुळे राज्याच्या कृषी आणि संलग्न क्षेत्राचा उणे ११.२ टक्के असणारा विकासदर आता १२.५ टक्के इतका घसघशीत वाढला आहे. कृषी व या क्षेत्राशी संबंधित विविध बाबींसाठी यंदा 26 हजार कोटी रुपयांच्या खर्चाचे नियोजन असून ही रक्कम आजवरच्या इतिहासात सर्वाधिक आहे. विविध उपाययोजनांमुळे यंदा शेती क्षेत्रातील उत्पन्नात ४० हजार कोटींची भर पडली आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुपटीने वाढविण्यासाठी राज्यात समृद्ध शेतकरी – उन्नत शेती अभियान सुरु करण्यात येत असून त्यात दोन लाख शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
राज्यात आजपासून स्वतंत्र मृद व जलसंधारण आयुक्तालय आणि गृहनिर्माण नियामक प्राधिकरण कार्यान्वित करण्यात आले आहे. मृद व जलसंधारण आयुक्तालयाच्या माध्यमातून माती व जलसंधारणाशी संबंधित सर्व योजनांची एकत्रित प्रभावी अंमलबजावणी होणार आहे. राज्यातील तूर उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाकडून विविध निर्णय घेण्यात आले आहेत. हवामानावरील कृषी क्षेत्राचे अवलंबन लक्षात घेता हवामान बदलाचा शेतकऱ्यांना फटका बसू नये यासाठी विदर्भ व मराठवाड्यात नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प राबविण्यात येत आहे. त्याचप्रमाणे स्वयंचलित हवामान केंद्रांच्या उभारणीस सुरुवात झाली आहे. शेतीला शाश्वत सिंचनाचे पाठबळ देण्यासाठी सर्व पातळ्यांवर उपाययोजना करण्यात आल्या असून त्यात जलयुक्त शिवार अभियान यशस्वी सिद्ध झाले आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.
देशातील एक अग्रगण्य मॅन्युफॅक्चरींग आणि फायनान्शियल हब ही महाराष्ट्राची ओळख अधिक मजबूत झाली असल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणतात, मेक इन महाराष्ट्र अभियानात झालेल्या आठ लाख कोटींच्या गुंतवणूक करारांपैकी एक लाख ९३ हजार कोटींची गुंतवणूक प्रत्यक्षात आली आहे. कौशल्य विकासासाठी सुरू असलेल्या कार्यक्रमांतर्गत सुमारे ४५ करार झाले असून जगातील विविध नामवंत उद्योग समुहांच्या सहकार्याने राज्यातील तरुणाई तंत्रकुशल करण्याचे प्रयत्न आहेत.
सामाजिक न्यायाची संकल्पना खऱ्या अर्थाने आमच्या सरकारकडून प्रत्यक्षात आणि परिपूर्णरित्या साकारली आहे. अरबी समुद्रातील शिवस्मारकाचे प्रधानमंत्र्यांच्या हस्ते जलपूजन होऊन कामास गती देण्यात आली आहे. इंदू मिल येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जागतिक दर्जाच्या स्मारकासाठीही जमिनीचे नुकतेच हस्तांतरण झाले आहे. विमुक्त जाती व भटक्या जमाती, विशेष मागासप्रवर्ग आणि इतर मागासवर्ग यांच्या विकासासाठी स्वतंत्र मंत्रालयाची स्थापना करून त्यासाठी साडेतेवीसशे कोटी रुपयांची भरीव तरतूद करण्यात आली आहे. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत राज्यातील सर्व बेघरांना २०२२ पर्यंत घरे देण्याची कार्यवाही गतिमान झाली असून राज्यातील १४२ शहरांमध्ये प्रकल्प राबविण्यात येत आहे. नागपूर येथे मा. प्रधानमंत्र्यांच्या हस्ते अलिकडेच ४० हजाराहून अधिक घरांच्या प्रकल्पाचे भूमीपूजन झाले आहे. स्वच्छ महाराष्ट्रासाठी आजपासून कचरा वर्गीकरण अभियानाचा शुभारंभ होत असून त्या माध्यमातून गावे आणि शहरांमधील कचऱ्याचे शास्त्रीय पद्धतीने वर्गीकरण करण्यात येणार आहे. यासोबतच कायदा आणि सुव्यवस्था, शिक्षण, आरोग्य, प्रशासन आदी क्षेत्रात सरकार महत्त्वपूर्ण बदलासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करीत असून त्यास सर्व घटकांनी साथ द्यावी, असे आवाहन फडणवीस यांनी केले आहे