कोल्हापूर । नागरिकत्व दुरुस्ती कायदा व NRC विरोधात जामिया मिलिया विद्यापीठ व अलिगड मुस्लिम विद्यापीठात शांततेने व अहिंसक मार्गाने निदर्शने करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या लाठीहल्याचा स्टुडंटस् फेडरेशन ऑफ इंडियाने जाहीर निषेध केला आहे.
विद्यार्थ्यांनी शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरू केले होते. पोलिसांनी विद्यापीठ कुलगुरुंची परवानगी न घेता दोन्ही विद्यापीठात प्रवेश केला व विद्यार्थ्यांवर जोरदार लाठीमार केला. तसेच अश्रुधुराचा वापर देखील करण्यात आला. पोलिसांच्या लाठीमारात अलिगड विद्यापीठातील सुमारे ५० विद्यार्थी जबर जखमी झाले असून त्यांना इस्पितळात हलवण्यात आले आहे. दिल्ली परिवहन मंडळाच्या चार बसेस काही समाजकंटकांनी पेटवल्या. त्या घटनेनंतर दिल्ली पोलिस जामिया विद्यापीठात घुसले व त्यांनी विद्यार्थ्यांना जोरदार मारहाण केली. काही विद्यार्थ्यांच्या पायावर गोळ्याही लागल्या आहेत, असा आरोप करत एसएफआयने निषेध केला आहे.
संविधान विरोधी नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात अत्यंत शांततेच्या व अहिंसक मार्गाने आंदोलन केले जात होते. संविधानाची शपथ घेणाऱ्या सरकारनेच पोलीस यंत्रणेचा वापर करून विद्यार्थ्यांच्या विरोध दर्शवण्याच्या मूलभूत हक्कावर दडपशाही केलेली आहे, असे एसएफआयच्या वतीने सांगण्यात आले.
लोकशाही व संवैधानिक मार्गाने संविधान वाचवण्यासाठी, देशाच्या अत्म्यावरच हल्ला करण्याऱ्याच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांसोबत आम्ही आहोत. या सर्व प्रकरणात सरकारने पोलिसांमार्फत केलेल्या दडपशाहीचा व अमानवी कृत्याचा स्टुडंटस् फेडरेशन ऑफ इंडिया, कोल्हापूरने निषेध केला आहे.
SFI राज्य सचिवमंडळ सदस्य नवनाथ मोरे, जिल्हाध्यक्ष पंकज खोत, जिल्हा सचिव सर्वेश सवाखंडे, जिल्हा उपाध्यक्ष हरी आवळे, जिल्हा सहसचिव प्रेरणा कवठेकर, रत्नदिप सरोदे, प्रमोद मोहिते, तुषार सोनुले, आकाश मुंढे आदी सदस्यांनी तीव्र निषेध नोंदवला आहे.