(सदर लेख ज्येष्ठ पत्रकार संजीव साबडे यांनी लिहिला असून त्यांच्या परवानगीने प्रकाशित. प्रस्तुत लेख लोकमत मध्ये प्रसिद्ध झाला आहे)
ब्रिटिश काळापासून मुंबई परिसराच्या विकासासाठी संबंधित भाग वा गावं भाडेपट्ट्याने देण्याची पद्धत होती. नंतरही उद्योग उभारणी व रोजगार निर्मितीच्या कारणास्तव जमीनदार व उद्योगपतींनी सरकारकडून कमी दरात, मोफत वा ठराविक भाडपट्ट्याने जमिनी मिळवल्या. बायरामजी जीजीभाई, एफ. ई. दिनशा तसंच अजमेरा, हिरानंदानी, रहेजा हे बिल्डर्स आणि मुंबई पोर्ट ट्रस्ट हे मुंबईतील मोठे जमीनदार आहेत. पण सर्वात मोठा जमीनदार म्हणजे एक उद्योग समूहाचे कुटुंबीय गोदरेज.
आज गोदरेज यांच्याकडे तब्बल ३४०० एकर जमीन आहे आणि तीही एकट्या विक्रोळी गावात. आता विक्रोळीचा इतका प्रचंड विकास झालाय की ते एक स्वतंत्र शहरच झालं आहे. गोदरेजच्या पूर्व व पश्चिम भागाचा विकास प्रामुख्याने झालं तो गोदरेज अँड बॉयजमुळे.
तुम्ही पूर्व द्रुतगती मार्ग किंवा लालबहादूर शास्त्री मार्गावरून जा, तुम्हाला गोदरेजचे उद्योग आणि गोदरेजच्या कर्मचारी वसाहती यांचं दर्शन घडतं. याशिवाय गोदरेज बांधकाम उद्योगात असल्यानं त्यांनी बांधलेले टॉवर्स दिसतात, ताज द ट्रीजसारखं हॉटेल दिसतं, त्यांची शाळा दिसते. विक्रोळीत सबकुछ गोदरेज आहे. विविध प्रकारची साबणं, वनस्पती व केसाचं तेल, टॉयलेट व घरात वापरली जाणारी बहुसंख्य उत्पादनं याचं गोदरेजची.
गोदरेज हा सव्वाशे वर्षांहून अधिक जुना उद्योग समूह. महिकावतीच्या बखरीत पोवे गावापाशी विखरवळी नावाचं गाव असल्याचा उल्लेख आढळतो. तीच आजची विक्रोळी आणि ती ज्या पोवे गावापाशी आहे ते आजचं पवई. इंग्रजीत आजही त्यामुळे विखरोळी (Vikhroli) असं लिहिलं जातं. विक्रोळीच्या पूर्वेला एका बाजुला कन्नमवार नगर ही २६५ इमारतींची म्हाडाची प्रचंड वसाहत आहे. दुसरीकडे टागोर नगर हीही म्हाडाचीच कॉलनी. या दोन्ही वसाहतींमुळे आजही विक्रोळीतील मराठीपण कायम राखलं गेलं आहे.
पार्कसाइट भागातही मराठी भाषकच अधिक. पूर्वीच्या कामगारांच्या घरांना गेल्या काही वर्षांत आलेलं मध्यमवर्गीय कुटुंबाचं रूप पाहून बरं वाटतं. पवई व घाटकोपरला लागून असूनही इथं मराठी लोक आजही दिसतात. अर्थात आता तिथं जे टॉवर्स येत आहेत, तिथलं चित्र मात्र वेगळं आहे. शिवाय जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडमुळे हा भाग पश्चिम उपनगराच्या जवळ आला आहे. अंधेरी-विक्रोळी मेट्रोचं कामही सुरू आहे. हायवेने जाताना एका बाजुला गोदरेज कंपनीची मालमत्ता दिसते.
त्या समोर आहे खारफुटीचं प्रचंड जंगल. तब्बल दोन हजार एकरात पसरलं आहे हे. भारतातील हे सर्वात मोठं शहरी खारफुटीचं जंगल आहे. त्या जंगलचाही बराचसा भाग गोदरेज यांच्या मालकीचा आहे आणि मुख्य म्हणजे खारफुटीचं जंगल टिकवून ठेवण्यात गोदरेज मंडळींचा मोठा वाटा आहे. त्या जंगलात देशा-विदेशातील पक्षी येतात. अनेक दुर्मीळ जलचर, समुद्री प्रजाती तेथील खाडीच्या परिसरात आजही आढळतात.
इंग्लंडचे प्रिन्स चार्ल्स मुंबईत आले, तेव्हा त्यांनी गोदरेज कुटुंबातील मंडळींसमवेत बोटीत बसून या खारफुटीच्या जंगलाची पाहणी केली होती. ही खारफुटी व पुढील मिठागर टिकवणं गरजेचं आहे. खारफुटी कायम राहावी, नष्ट होऊ नये यासाठी तरी आपल्याला असे गोदरेज हवेतच! त्यांनी या खारफुटीच्या जंगलाची व खाडीची देखभाल केली नसती, काळजी घेतली नसती तर आज हा भाग अनधिकृत घरं व उद्योगाचा आगार बनला असता. याचं कारण घाटकोपरच्या दिशेला गेलात की तिथं एके काळच्या खाडीवर प्रचंड अनधिकृत बांधकाम झाल्याचं दिसतं.