
रत्नागिरी, 20 August : कोरोनामुळे मार्चपासून बंद ठेवण्यात आलेली एसटीची आंतरजिल्हा वाहतूक अखेर आज(गुरुवार)पासून सुरू झाली आहे. त्यामुळे रत्नागिरी आगारातूनही कोल्हापूर, मिरज आणि सांगलीसाठी आज एसटी बस सुटल्या. तब्बल 5 महिन्यांनंतर पहिल्यांदाच या मार्गावर प्रवासी वाहतूक सुरु झाली. तब्बल सहा एसटी बसेस आज रत्नागिरी आगारातून इतर जिल्ह्यात गेल्या. एसटी प्रवासाकरिता ई पासची आवश्यकता नसल्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे .
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे राज्यातील एसटीची सेवा 23 मार्चपासून बंद ठेवण्यात आली होती. त्यानंतर 22 मे पासून राज्यातील रेड आणि कंटेनमेंट झोन वगळता जिल्ह्यांतर्गत वाहतूक सुरु करण्यात आली. दरम्यान मिशन बिगेन अगेन अंतर्गत अनेक सवलती दिल्या जात आहेत. त्यानुसार राज्यातील एसटीची वाहतूक सुरु करण्याची मागणी जोर धरत होती. दरम्यान चाकरमान्यांसाठीही एसटी धावून आली होती. गणेशोत्सवासाठी नागरिकांना प्रवास करता यावा याकरिता देखील एसटीची वाहतूक सुरु करण्याची मागणी होत होती, त्यानुसार राज्य सरकारने एसटी महामंडळाला आंतरजिल्हा वाहतूक सुरु करण्यास परवानगी दिली आहे. या पार्श्वभूमीवर रत्नागिरी आगारातून (आज)गुरुवारपासून आंतर जिल्हा वाहतूक सुरु झाली. पहाटे 5 च्या सुमारास पहिली फेरी कोल्हापूर मार्गावर सुटली. कोल्हापूरसाठी एकूण 4 गाड्या, तर मिरज आणि सांगलीसाठी प्रत्येकी एक गाडी सुटल्याची माहिती एसटी विभागाच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे. आंतरजिल्हा वाहतूक सुरु झाली, त्यात इ पासची आवश्यकता नाही, त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.