खा.विनायक राऊत यांच्या प्रचारासाठी जाहिर सभेचे आयोजन
रत्नागिरी: रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार विनायक राऊत यांच्या जाहिर प्रचारा सभेसाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख श्री.उद्धव ठाकरे आज रत्नागिरीत येणार आहेत. साळवी स्टॉप येथील जलतरण तलावाशेजारील जागेत सायंकाळी ६.३० वाजता ते उपस्थित शिवसैनिकांना मार्गदर्शन करणार आहेत. यावेळीश्री.ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील ४८ जागांपैकी प्रमुख चुरशीच्या मानल्या जाणार्या जागांमध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे. या मतदारसंघात केंद्रीय मंत्री ना.नारायण राणे विरुद्ध महाविकास आघाडीचे विद्यमान खासदार विनायक राऊत असा सामना होत आहे. श्री. ठाकरे व श्री. राणे यांच्यातील राजकीय वैर सर्वांना परिचित आहे. याच पार्श्वभूमीवर आज खासदार विनायक राऊत यांच्या प्रचारासाठी येणारे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कोणावर निशाणा साधतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
श्री.उद्धव ठाकरे हे विमानाने मुंबईहून रत्नागिरीकडे येणार आहेत. त्यानंतर ते शिवसैनिकांची संवाद साधतील. सायंकाळी ६.३० वाजता ते साळवी स्टॉप येथील जलतरण तलावा शेजारी जाहीर सभेला संबोधित करतील. त्यानंतर सोमवारी सकाळी पुन्हा मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहेत.
श्री.उद्धव ठाकरे यांच्या जाहीर सभेची जय्यत तयारी साळवी स्टॉप येथे सुरू करण्यात आली आहे. शनिवारी सायंकाळी जिल्हाप्रमुख विलास चाळके, तालुकाप्रमुख प्रदीप उर्फ बंड्या साळवी, विधानसभा क्षेत्र संघटक प्रमोद शेरे, काँग्रेसचे कोकणचे नेते श्री. रमेश कीर यांनी सभास्थळाची पाहणी केली. मोठ्या संख्येने शिवसैनिक या सभेला उपस्थित राहणार असल्याचा दावा शिवसेनेकडून करण्यात आला आहे.