मुंबई : वेंगुर्ला (जि. सिंधुदुर्ग) येथील निशाण धरणाची २.५ मी. उंची वाढविण्यासाठी आवश्यक १० कोटी रूपयांचा निधी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत मंजूर करण्यात आला. याबाबत ३० एप्रिलपर्यंत निविदा प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश लोणीकर यांनी दिले.
गृह , वित्त नियोजन राज्यमंत्री दीपक केसरकर, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव संतोष कुमार, संचालक (तांत्रिक) हेमंत लांडगे, वेंगुर्ला नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रामदास कोकरे, मुख्य अभियंता मनिषा पलांडे आदी यावेळी उपस्थित होते. वेंगुर्ला शहर पाणीपुरवठा (टप्पा दोन) योजनेअंतर्गत हे काम होणार आहे.
वेंगुर्ला शहरास निशाण धरणातून दरवर्षी फेब्रुवारी अखेरपर्यंत सुरळीत पाणीपुरवठा केला जातो. मात्र, उन्हाळ्यात मार्चपासून पाणी कमी पडत असल्याने शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा करावा लागत आहे. या धरण क्षेत्रात पुरेसा पाऊस पडूनही धरणाची उंची कमी असल्याने परिसरातील गावांच्या आवश्यकतेएवढा साठा होत नव्हता. त्या पार्श्वभूमीवर धरणाची उंची वाढवावी, अशी मागणी वेंगुर्ला नगरपरिषदेतर्फे करण्यात आली. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आल्याचे लोणीकर यांनी यावेळी सांगितले.
वेंगुर्ला शहर पाणी पुरवठा योजना टप्पा दोन ही योजना नगरपरिषदेकडे हस्तांतरित करण्यात आली होती. निशाण धरणाची जलसंचय पातळी १७२ मीटरपासून १८१ मी.पर्यंत व उंची १७४ मी. वरून १८४.७० मी. पर्यंत प्रस्तावित होते. तथापि, निधी उपलब्ध न झाल्याने हे काम होऊ शकले नाही. तथापि, वेंगुर्ल्याचा पाणी प्रश्न पाहता धरणाची उंची वाढविण्यासाठी तत्काळ १० कोटी रूपयांच्या निधी मंजूर करण्यात आला व याबाबतची निविदा प्रक्रिया एका महिन्याच्या आत पूर्ण करण्याचे निर्देश लोणीकर यांनी दिले. यामुळे वेंगुर्ला धरणाची उंची वाढविण्याच्या कामाला गती येणार असून आगामी काळात धरणाची पाणी साठवणूक क्षमता वाढून वेंगुर्लेकरांना नियमित, सुरळीत पाणीपुरवठा शक्य होणार आहे.