
वैकुंठभाई मेहता संस्थेतील आंतरराष्ट्रीय परिषदेत दीपक पटवर्धन यांचे प्रतिपादन;
ग्रामीण अर्थकारणाचा कणा जपण्याचे आवाहन
पुणे/रत्नागिरी: “सहकारी संस्था या केवळ वित्त पुरवठा करणाऱ्या संस्था नसून ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ देणारा मुख्य आधार आहेत. बदलत्या काळात स्पर्धा आणि तंत्रज्ञानाचा स्वीकार करत प्राथमिक कृषी पतसंस्थांनी (पॅक्स) आपला बहुआयामी सहभाग सुनिश्चित केला पाहिजे,” असे परखड मत रत्नागिरीतल्या सहकार क्षेत्रातील नामांकित व्यक्तिमत्त्व ऍड. दीपक पटवर्धन यांनी व्यक्त केले.
पुणे येथील वैकुंठभाई मेहता राष्ट्रीय सहकारी प्रबंध संस्था (VAMNICOM) येथे ‘प्राथमिक कृषी संस्थांच्या व्यावसायिक विकासासाठी योजना’ या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली होती. या परिषदेत भारत, नेपाळ, म्यानमार, बांगलादेश, झांबिया आणि गांबिया या देशांतील निमंत्रित प्रतिनिधींसमोर प्रमुख वक्ते म्हणून दीपक पटवर्धन बोलत होते.

प्रमुख मुद्दे:
पॅक्स हा ग्रामीण अर्थकारणाचा कणा:
दीपक पटवर्धन यांनी यावेळी स्पष्ट केले की, प्राथमिक कृषी पतसंस्था (PACS) या आजही ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेचा मुख्य कणा आहेत. मात्र, जुन्याच शैलीत काम न करता बदलत्या जगासोबत जुळवून घेणे आता काळाची गरज बनली आहे
बदल स्वीकारूनच यशोगाथा शक्य: “बदलते तंत्रज्ञान, बदलती बाजारपेठ, तीव्र स्पर्धा आणि पर्यावरणातील बदल यांसारख्या आव्हानांना सामावून घेत सहकारी संस्थांनी पुढे जायला हवे. यातच सहकाराची खरी यशोगाथा दडलेली आहे,” असे ते म्हणाले
पश्चिम महाराष्ट्राचे मॉडेल आणि स्वरूपानंद पतसंस्थेचा प्रवास:
आपल्या भाषणात त्यांनी पश्चिम महाराष्ट्रातील ‘अंब्रेला टाईप’ सहकार विकास आणि त्यामुळे वाढलेली आर्थिक गती याचे विविध दाखले दिले. तसेच, स्वरूपानंद पतसंस्थेने केलेली भरीव भांडवल निर्मिती आणि एनपीए (NPA) ६३ टक्क्यांवरून थेट ० टक्क्यांवर आणण्यासाठी केलेले यशस्वी प्रयत्न व कष्टांचा विशेष ऊहापोह केला.
सहकारातून समृद्धी’ संकल्पना :
पंतप्रधानांनी दिलेला ‘सहकारातून समृद्धी’ हा दृष्टिकोन वास्तवात आणण्यासाठी युवा वर्गाचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे, असे सांगत संस्थांनी कोणत्या प्रकारचे अंतर्गत बदल के पाहिजेत, यावर त्यांनी अनेक उदाहरणांसह मार्गदर्शन केले.
३५ वर्षांच्या प्रदीर्घ वाटचालीची पावती” — दीपक पटवर्धन
आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रतिनिधींसमोर सहकाराची यशोगाथा मांडल्यानंतर प्रतिक्रिया देताना दीपक पटवर्धन म्हणाले, “आंतरराष्ट्रीय परिषदेत सहकारी संस्थांची भूमिका मांडताना आणि उपस्थित विविध देशांच्या प्रतिनिधींच्या शंकांचे निरसन करताना मनस्वी समाधान मिळाले. यांसारख्या मोठ्या व्यासपीठावर मिळालेली संधी ही माझ्या ३५ वर्षांच्या प्रदीर्घ आणि यशस्वी सहकारी वाटचालीचीच पावती आहे, असे मला वाटते.”