नवी दिल्ली : नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात पैसे आकारुन आधारसंबंधी सेवा पुरवणाऱ्या अनधिकृत संकेतस्थळे आणि मोबाईल ॲप्लिकेशन्सविरुद्ध कडक कारवाई करत भारतीय विशिष्ट ओळखपत्र प्राधिकरणाने १२ संकेतस्थळे आणि १२ मोबाईल ॲप्लिकेशन्स बंद केली आहेत.
प्राधिकरणाने कोणत्याही मोबाईल ॲप्लिकेशन्सच्या मालकांना आधारसंबंधी सेवा देण्याचे अधिकार दिलेले नाहीत, असे प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजय भूषण पांडेय यांनी म्हटले आहे.
अनधिकृत आधारसंबंधी सेवा पुरवणाऱ्या संस्थांविरुद्ध सतर्क राहण्याचे आवाहन त्यांनी जनतेला केले.
जर एखाद्या व्यक्तीचे आधारकार्ड हरवले, तर त्याला प्राधिकरणाच्या संकेतस्थळावरुन मोफत आधार कार्ड डाऊनलोड करता येईल. डाऊनलोड केलेल्या आधारची छापील प्रत मूळ आधार पत्राप्रमाणे वैध असेल.