रत्नागिरी (आरकेजी): एसटी कर्मचाऱ्यांनी अचानक पुकारलेल्या कामबंद संपाचा फटका रत्नागिरी जिल्ह्यालाही बसला. यात १० वी चा निकाल पाहण्यासाठी निघालेले विद्यार्थी भरडून निघाले. पगारवाढीसह विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी हे आंदोलन सुरु केले आहे. मात्र या आंदोलनामुळे प्रवाशांचे दिवसभर हाल झाले.
रत्नागिरी जिल्ह्यातील ९ डेपो पैकी २ डेपोतून मोजक्याच बस सोडण्यात आल्या आहेत. गुहागर, चिपळूण, दापोली, खेड, देवरूख, राजापूर,मंडणगड डेपोत गाड्या पूर्ण बंद आहेत. त्यामुळे अनेक प्रवासी खोळंबले आहेत. त्यामुळे मुंबई, पुणे ठिकाणी जाणाऱ्या प्रवाशांचे हाल झाले. त्यातच आज दहावीचा निकाल होता. ग्रामीण भागात नेटची सुविधा नसल्यामुळे अनेक विद्यार्थी शहरातील सायबर कॅफेत येत असतात. मात्र एसटी बंदचा फटका या विद्यार्थ्यांना बसला.