रत्नागिरी (आरकेजी): एसटी महामंडळाच्या इतिहासात सरकारने ऐतिहासिक निर्णय घेत वेतन व भरघोस वाढ केल्याने एसटी कर्मचार्यांनी माळनाका येथील विभागीय कार्यालयासमोर फटाके फोडून जल्लोष साजरा केला. यावेळी बेंजोच्या तालावर काही कर्मचार्यांनी ठेकाही धरला.
२०१६-२०२० चा एसटीचा वेतन करार रखडला आहे. मात्र गेली काही वर्षे प्रलंबित असलेली एसटी कर्मचार्यांची पगारवाढ अखेर परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी नुकतीच केली आहे. यामध्ये पाच वर्षे सेवा झालेल्या कनिष्ठ श्रेणीतल्या कर्मचार्यांसाठी चार हजार ते नऊ हजार पगारवाढ होणार आहे. तीन वर्षे सेवा झालेल्या कनिष्ठ श्रेणीतल्या कर्मचार्यांसाठी एक हजार ते पाच हजार वेतनवाढ करण्यात येणार आहे. जे कर्मचारी नुकतेच आले आहेत, त्यांना २००० रूपये वाढ देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे ज्येष्ठ कर्मचारी यांना १२ हजार वेतनवाढ देण्यात येणार आहे. एसटी कर्मचार्यांसाठी ही ऐतिहासिक वेतनवाढ असून परिवहन मंत्री दिवाकर रावते यांचे जाहीर आभार मानण्यासाठी महाराष्ट्र एसटी कामगार सेनेच्या रत्नागिरी विभागातर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संघटनेचे कार्याध्यक्ष शिवाजी चव्हाण, शहर अध्यक्ष बिपीन बंदरकर, विभागीय अध्यक्ष विजय खेडेकर, विभागीय सचिव सचिन वायंगणकर, रत्नागिरी डेपो सचिव दत्तप्रसाद पाडाळकर आदींसह संघटनेचे सदस्य उपस्थित होते. यावेळी आनंदोत्सव साजरा करण्यात आला.