
मुंबई, दि. २४ (प्रतिनिधी) – ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांनी आपल्या मतदारसंघातील विकासकामांना मोठी गती देत अवघ्या एका आठवड्यात साठहून अधिक विविध विकासकामांचे भूमिपूजन करून विकासकामांचा धडाका लावला आहे. खासदार निधीतून मोठ्या प्रमाणावर विकासकामांना सुरुवात होत असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण असून, नागरिकांनी खासदार संजय दिना पाटील यांचे आभार मानले आहेत.

ईशान्य मुंबईतील नागरिकांच्या दैनंदिन गरजा, स्थानिक समस्या व विविध भागांतील प्रलंबित मागण्यांचा विचार करून या विकासकामांना प्राधान्य देण्यात आले आहे. नागरिकांच्या मागण्यांची दखल घेत प्रत्यक्षात कामे सुरू होत असल्याने खासदार संजय दिना पाटील यांच्या कार्यपद्धतीचे नागरिकांकडून कौतुक होत आहे. या विकासकामांमध्ये विविध ठिकाणी सभामंडपांची पुनर्बांधणी, शेड उभारणी, लादीकरण, शौचालयांची पुनर्बांधणी, चौकांचे सुशोभीकरण, इमारतींवर सभामंडप उभारणे, मंदिरांचा जिर्णोध्दार, बालवाडी, समाजकल्याण केंद्र, खुले सभागृह आदी विविध नागरी आणि सामाजिक सुविधांच्या कामांचा समावेश आहे. या सुविधांमुळे स्थानिक नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून, परिसरातील सामाजिक आणि सार्वजनिक सुविधांमध्येही लक्षणीय सुधारणा होणार आहे. ईशान्य मुंबईतील अनेक भागांमध्ये नागरिकांना सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांसाठी पुरेशा सुविधा उपलब्ध नव्हत्या. सभामंडप अथवा खुले सभागृह नसल्याने नागरिकांना विविध कार्यक्रम आयोजित करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. नागरिकांची ही अडचण लक्षात घेऊन खासदार संजय दिना पाटील यांनी अशा सुविधांच्या उभारणीला प्राधान्य दिले आहे. त्यामुळे महिला, ज्येष्ठ नागरिक, युवक तसेच विविध सामाजिक संस्थांना या सुविधांचा मोठा फायदा होणार आहे. एका आठवड्यात साठहून अधिक विकासकामांचे भूमिपूजन करण्याची ही मोठी मोहीम खासदार संजय दिना पाटील यांच्या विकासाभिमुख कार्यशैलीचे उदाहरण ठरत आहे. मतदारसंघातील प्रत्येक भागाचा समतोल विकास व्हावा, नागरिकांना आवश्यक त्या मूलभूत सुविधा मिळाव्यात आणि स्थानिक पातळीवरील समस्या दूर व्हाव्यात, यासाठी त्यांनी खासदार निधीचा प्रभावीपणे वापर करण्यावर भर दिला आहे.
भूमिपूजनाच्या विविध कार्यक्रमांदरम्यान स्थानिक नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवत विकासकामांचे स्वागत केले. अनेक ठिकाणी नागरिकांनी आपल्या परिसरातील मागणी पूर्ण होत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. ईशान्य मुंबईतील विकासकामांना सातत्याने प्राधान्य देत नागरिकांच्या गरजा समजून घेऊन कामे मार्गी लावण्याचा खासदार संजय दिना पाटील यांचा प्रयत्न यापुढेही सुरू राहणार आहे. त्यामुळे एका आठवड्यात साठहून अधिक भूमिपूजनांचा टप्पा गाठत त्यांनी ईशान्य मुंबईच्या विकासाच्या दिशेने आणखी एक महत्त्वाचे पाऊल टाकले आहे.














