
एक वर्षाचा संघटनात्मक प्रवास; नव्या संकल्पांची नांदी!
चिपळुणातील प्राथमिक शिक्षक पतपेढी सभागृहात आयोजन
चिपळूण : भारतीय जनता पार्टीचे रत्नागिरी दक्षिण जिल्हाध्यक्ष श्री. प्रशांत बबन यादव यांनी १९ ऑगस्ट २०२५ रोजी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. त्यांच्या पक्षप्रवेशाला १९ ऑगस्ट २०२६ रोजी एक वर्ष पूर्ण झाले. या वर्षपूर्तीनिमित्त पक्ष संघटनेशी जोडलेल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी आणि त्यांच्या योगदानाचा सन्मान करण्याच्या उद्देशाने मंगळवार, दि. २५ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता वर्षपूर्ती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
रत्नागिरी जिल्ह्याच्या विकासाचे ध्येय समोर ठेवून गेल्या वर्षभरात पक्ष संघटन अधिक बळकट करण्यासाठी, कार्यकर्त्यांशी सातत्याने संवाद साधण्यासाठी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देत विविध उपक्रम व विकासकामांना चालना देण्यासाठी प्रशांत यादव यांनी प्रयत्न केले. या वर्षभराच्या प्रवासाचा आढावा घेत आगामी काळातील संघटनात्मक वाटचालीसाठी नवी दिशा आणि नवे संकल्प या स्नेहमेळाव्यातून अधोरेखित केले जाणार आहेत.
“सब का साथ, सब का विकास आणि सब का विश्वास” या विचारधारेतून रत्नागिरी जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी एकजुटीने काम करण्याचा संकल्प या निमित्ताने व्यक्त केला जाणार आहे. पक्षप्रवेशाच्या वर्षपूर्तीनिमित्त आयोजित हा स्नेहमेळावा केवळ वर्षपूर्तीचा सोहळा न राहता, कार्यकर्त्यांच्या सामूहिक सहभागातून पुढील वाटचालीची दिशा निश्चित करणारा महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार आहे.
हा स्नेहमेळावा मंगळवार, दि. २५ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता रत्नागिरी जिल्हा प्राथमिक शिक्षक पतपेढी सभागृह, प्रांत कार्यालयाच्या मागे, शिवाजीनगर, चिपळूण येथे होणार आहे. पक्षप्रवेशाच्या एका वर्षाच्या कार्यप्रवासाला कार्यकर्त्यांच्या प्रेमाची आणि विश्वासाची साथ देत नव्या ऊर्जेने पुढील वाटचालीला प्रारंभ करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, ज्येष्ठ नेते, बूथस्तरीय कार्यकर्ते तसेच पक्षाशी संबंधित प्रमुख व्यक्तींनी आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.














