रत्नागिरी : कोकण किनारपट्टीवरील पर्यटनाच्या दृष्टीने पुन्हा गतवैभव आणण्यासाठी पावले उचलण्यात आली आहेत. त्या अनुषंगाने मुंबईहून निघालेले भव्य व आलिशान असे ‘एम.एस.कर्णिका’ प्रवासी जहाज गुरूवारी रत्नागिरीत दाखल झाले. 646 खलाशी आणि 383 प्रवाशांना घेऊन आलेले हे जहाज यशस्वीपणे आणि सुरक्षितपणे रत्नागिरीतील जयगड बंदर कार्यक्षेत्रात आणि मे. आंग्रे पोर्ट प्रा. लि. यांचे लावगण येथील बंदर संकुलात नांगरण्यात आले होते.
एकेकाळी येथील बंदरांचा गजबजता इतिहास कोकणला मिळालेले वैभव मानले जात होते. आज कोकण रेल्वेला जेवढे महत्व आहे. तेवढेच त्या काळात कोकण किनारपट्टीवरील बंदरांना होते. पण शासनाच्या उदासिन धोरणामुळे गेल्या काही वर्षापासून या बंदरांचा विकासही लोप पावला. मात्र आता पुन्हा अनेक वर्षांनंतर कोकण किनारपट्टीवरील बंदरांत फेरीबोटीची सेवा सुरू करण्याच्या हालचाली शासनाकडून सुरू झाल्या आहेत. प्रवासी वाहतूकीबाबत येथील बंदरांची भौगोलिक स्थिती, त्या अनुषंगाने प्रवासी बोटीची क्षमता याबाबत सर्व्हेक्षण केले जात होते.
कोकण किनारपट्टीवरील बहुतांशी बंदरे पश्मिमेकडील भागातच वसलेली आहेत. ब्रिटीशकाळात या बंदरांना फार मोठे महत्व होते. दळणवळण साधनांचा पुरेशा पमाणात अभाव हे ही त्याला मुख्य कारण होते. त्यामुळे विशेषकरून सागरी मार्गेच मोठ मोठी गलबते व त्यातून मालाची मोठी आयात तसेच पवासी बोटींची वाहतूक होत होती. सन 1860 पूर्वीपासून ते अगदी सन 1950-51 पर्यंतच्या काळात येथील बंदरांना वैभवशाली इतिहास प्राप्त झाला होता. नैसर्गिक व भौगोलिक रचनेमुळे बहुतांशी बंदरे पश्चिम दिशेला असली तरी वादळसदृश्यकाळातही सुरक्षित मानली जात आहेत. मुंबई, कोचीन, देवगड, कालिकत, मुसाकाझी, पालशेत, रत्नागिरी, हर्णे, विजयदुर्ग, जैतापूर, जयगड, आदी बंदरांतून पवासी बोटींचे थांबे होते.
पाण्याची खोली भरपूर असल्याने य वाहतूकीलाही त्याचा लाभ मिळत होता. देवगड बंदरात पॅसेंजरसाठी उत्तम कंपन्या बोट कंपन्या उपलब्ध होत्या असे सांगितले जाते. स्वातंत्र्यानंतर या बंदराचा विकास होण्याऐवजी अधोगतीचा पवास सुरू झाला. राजापूरमधील सन 1941 मध्ये मुसाकाझी बंदराला विशेष महत्व होते. प्रवासी बंदर म्हणून या बंदराची ख्याती होती. बी.एस.एन.सिंदीया या कंपनीच्या बोटी या भागातून प्रवासी वाहतूक करत असत. मफतलाल, हाजीमलंग यांनी प्रवासी वाहतूक त्या काळात सुरू केली होती. पालशेत बंदरही स्वातंत्र्यपूर्व काळात वैभवशाली बंदर म्हणून ओळखले जात होते. याठिकाणहून सागरी प्रवासी व मालवाहतूक सेवा सुरू केली. रत्नागिरी येथून मुंबईकडे जाणारी बोट जयगड, बोऱयाकडून पालशेतमार्गे हर्णे बंदरातून पुढे मुंबईला जात असल्याचे सांगितले जाते.
किनारपट्टीवरील या बंदरांना पर्यटनाच्या दृष्टीने पुन्हा गतवैभव आणण्यासाठी पावले उचलण्यात आली आहेत. रत्नागिरी बंदरे समुहातील जयगड बंदर कार्यक्षेत्रात आणि मे. आंग्रे पोर्ट प्रा. लि. यांचे लावगण येथील बंदर संकुलात मे. जलेश कंपनीचे प्रवाशी जहाज ‘एम.एस कर्णिका’ 10 ऑक्टोबर रोजी सकाळी 8 वाजता 646 खलाशी आणि 383 प्रवाशांसह यशस्वीपणे आणि सुरक्षितपणे दाखल झाले. महाराष्ट्र सागरी मंडळ, रत्नागिरी बंदरे समुहाचे प्रादेशिक बंदर अधिकारी कॅ. संजय उगलमुगले यांनी जहाज कप्तानचे स्वागत केले. सुरक्षित आणि संरक्षित नौकानयनाबाबत विचारणा केली असता, जहाज कप्तानने त्याबाबत समाधान व्यक्त केल्याचे उगलमुगले यांनी सांगितले. यानंतर प्रादेशिक बंदर अधिकारी यांनी महाराष्ट्र सागरी मंडळाच्या वतीने प्रवासी जहाज वाहतूकीच्या भवितव्यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या. प्रवाशांकरीता स्विमिंग पुल, हॉटेल व रेस्टॉरंट रुम्स, बच्चे कंपनी करीता खेळणी, जिम व स्लाईड आदी सुविधा ‘कर्णिका’ जहाजावर आहेत. यादिवशी दिवसभराच्या मुक्कामानंतर हे जहाज गुरुवारी सायंकाळी 6 वा.आंग्रे पोर्ट कडून होणार मुंबईकडे रवाना झाले. प्रवाशांच्या प्रतिसाद मिळाल्यास ही सेवा कायम सुरू राहणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली.