मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेली छोटा सैनिक ही पदवी मनसेचे जयंत दांडेकर आता खर्या अर्थाने सार्थकी लावण्याचा प्रयत्न करणार आहेत. तीन फुट उंची असणार्या दांडेकर यांना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रभाग क्रमांक ११८ तून उमेदवारी दिली आहे. त्यामुळे सध्या ‘मूर्ती लहान पण किर्ती महान,’ याची प्रचिती विक्रोळीत येत आहे. आता हा मनसैनिक निवडणुकीचा किल्ला लढविण्यासाठी सज्ज झाला आहे.
दांडेकर पूर्वश्रमीचे शिवसैनिक आणि सध्या मनसेचे शाखाध्यक्ष आहेत. प्रभागात त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेत अनेक इच्छूक रिंगणात असताना अखेरच्या क्षणी दांडेकर यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ घालण्यात आली. मनसेकडून गुरुवारी रात्री एबी फार्म मिळाल्यानंतर दांडेकर यांनी भांडूप येथे शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. प्रभाग क्रमांक ११८ मधून मनसेचे माजी आमदार मंगेश सांगळे यांनी बंडखोरी करत मनसेसमोर तगडे आव्हान उभे केले आहे. सांगळे यांना भाजपातून उमेदवारी मिळाली आहे. या पार्श्वभूमीवर मनसेकडून कोण्या धनाढ्याला इच्छूकाला उमेदवारी मिळेल अशी अटकळ बांधण्यात येत होती. परंतु, राज ठाकरे यांनी सगळे अंदाज खोटे ठरवत सामान्य कार्यकर्ता पण दांडगा जनसंपर्क असणार्या दांडेकर यांना उमेदवारी दिली आहे. आता दांडेकर हे आव्हान कसे पेलतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
“मनसेमुळे मोठे झालेले काही जण पक्षासोबत गद्दारी करत आहेत. मतदारच त्यांना त्यांची जागा दाखवतील. ही निवडणूक धनाढ्य उमेदवार विरुद्ध सामान्य अशी आहे. आमचाच विजय होणार.” – जयंत दांडेकर, मनसे उमेदवार, प्रभाग क्रमांक ११८