
डोंबिवली, (प्रशांत जोशी) : ‘आनंदाचे डोही आनंद तरंग’ या उक्तीप्रमाणे सांस्कृतिक डोंबिवली शहरात सामाजिक संस्थांच्या माध्यमातून पारंपारिक उपक्रमांच्या कार्यक्रमची रेलचेल सुरू झाली आहे. दिवाळी सणाची चाहूल लागल्याने पर्यावरणीय आकाश कंदील आणि पणत्या रंगविण्याच्या कार्यशाळेला चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. अशा कार्यशाळेतून मुलांनो स्वावलंबी व्हा असा संदेशही दिला जात आहे.
डोंबिवलीच्या टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि रोटरी क्लब डोंबिवली सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने सलग सातव्या वर्षी पर्यावरणीय आकाशकंदील बनवण्याचे शिबिर रविवारी पूर्वेकडील सर्वेश हाँल, येथे आयोजित करण्यात आले होते. शिबीरात मयुरेश गद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली आकाश कंदील कसे तयार करायचे याचे प्रशिक्षण देण्यात आहे. विशेष म्हणजे यासाठी लागणारे सर्व साहित्य आयोजकांनी दिले होते. या शिबिराचा लाभ 60 जणांनी घेतला. मुख्य बाब म्हणजे त्यापैकी 40 पालकांनी आपल्या मुलांबरोबर कंदील बनवण्याचा आनंद घेतला. मोबाईल गेमपासून मुलांना परावृत्त करण्यासाठी अशा प्रकारची शिबीरे ही काळाची गरज आहे अशा प्रतिक्रिया काही पालकांनी दिल्या आहेत. सदर उपक्रमाला रोटरी क्लब डोंबिवली सिटी व टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते. या उपक्रमाची जबाबदारी गणेशोत्सव मंडळाच्या सोनाली पाठारे व प्राची शेंबेकर यांनी यशस्वीपणे सांभाळली.
त्याचप्रमाणे इनरव्हिल कल्ब ऑफ डोंबिवली ईस्टने शनिवारी पर्यावरणपूरक आकाशकंदील व पणत्या रंगविण्याची कार्यशाळा आयोजित केली होती. या कार्यशाळेत 61 विद्यार्थी सहभागी झाले होते. इनरव्हिलच्या अध्यक्षा जयश्री तांबट व सचिव विजया नांद्रे यांनी आयोजित केलेल्या या कार्यशाळेत कलाशिक्षिका लीना चौधरी यांनी मुलांना पर्यावरणपूरक आकाश कंदील व पणत्या रंगविण्यास शिकवले. मुलानी मोठ्या उत्साहात छान छान आकाशकंदील बनविले. रंगरेषेचे अचूक भान ठेवून पणत्या रंगविल्या. सदर कार्यशाळेसाठी कॅमलिन इंडिया कंपनीने रंगसाहित्य पुरविले होते. सदर कार्यक्रमास इनरव्हिलचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. इनरव्हिलचा हा समाजोपयोगी उपक्रम विद्यार्थ्यांना स्वालंबनाची शिकवण व पर्यावरणाचा संदेश देणारा आहे असे मत संस्थेच्या अध्यक्षा जयश्री तांबट यांनी व्यक्त केले.














