डोंबिवली : कल्याण डोंबिवली महानगरपालिका विभागातील पालिकेच्या रुग्णालयात रुग्णालयीन सेवांचा पूर्णपणे फज्जा उडाला आहे. गोर-गरीब रुग्णांना रुग्णालयात तुच्छतेची आणि लाजिरवाणी सेवा अनुभावी लागत आहे. गरिबांना औषध उपचारांसाठी अन्यत्र जा असे आदेश रुग्णालय प्रशासन देत आहे. आरोग्याबाबत रुग्णांची पिळवणूक होत असून गरिबांचा वाली कोण असे प्रश्न विचारले जात आहेत. सुधारणा करा अशा विषयाची मागणी अनेक वेळा करूनही प्रशासन डोळेझाक करीत आहे. उपचारासाठी रुग्णालयात आलेल्या गर्भवती महिलेस बाहेरील वाट दाखविण्याची घटना नुकतीच घडली आहे. या दुर्दैवी घटनेचा जाब मनसेने विचारला असून यापुढे जर पालिका रुग्णालयात गर्भवती महिलेस उपचार मिळाला नाही तर मनसे आपल्या स्टाईलने ‘खळ-खट्याक’ करेल अशा इशारा निवेदनाच्या माध्यमांतून पालिका आयुक बोडके यांना दिला आहे.
दोन दिवसापूर्वी डोंबिवली विभागातील एका गर्भवती महिलेस प्रस्तुतीच्या वेदना सुरु झाल्यामुळे तिला तिच्या नातेवाईकांनी पालिकेच्या शास्त्रीनगर रूग्णालयात दाखल केले. परंतु अशा परिस्थितीत पालिका प्रशासनाने हात वर करून आम्ही काहीच करू शकत नाही असे सांगितले. प्रशासन इतक्यावरच थांबले नाही तर तुम्ही खाजगी रुग्णालयात जा असा प्रेमाचा सल्लाही दिला. परंतु आर्धिकदृष्ट्या हैराण असलेल्या गोर-गरीब महिलेने कुठे जायचे हा मोठा प्रश्न होता. अखेर ठाणे येथील सरकारी रुग्णालयाची वाट पकडण्याचे ठरले. परंतु त्याबाबतही रुग्णवाहिका नसल्याने गंभीर प्रश्न निर्माण झाला. अशा या प्रशासनाच्या कारभारामुळे गरिबांनी मरण पत्करायच का असा सवाल नातेवाईकांनी केला. अखेर सामाजिक बांधिलकी जपणाऱ्यांनी पर्यायी व्यवस्था करून गर्भवती महिलेस ठाण्याला नेले. अशा या प्रशासनाच्या नाकर्तेचा जाब मनसेने विचारला आहे.
पालिकेच्या रुक्मिणीबाई आणि शास्त्रीनगर रुग्णालयाची अवस्था अतिशय वाईट असून रुग्णांना उपचार मिळणे कठीण झाले आहे. पालिका प्रशासन सत्ताधाऱ्यांच्या हातातील बाहुले बनले आहे. माजी नगरसेवक प्राजक्त पोतदार यांनी डोंबिवलीतील सूतिकाग्रहाचा प्रश्न लावून धरूनही त्याचा काहीच उपयोग होत नाही. 1995 पासून सत्तेची ऊब घेणाऱ्या शासनकर्त्यांना गोर-गरीब जनतेची पर्वा नाही. पालिकेच्या रूग्णालयातून रुग्णांना जोपर्यत चांगली सेवा मिळत नाही तोपर्यत मनसेचे आंदोलन सूरूच राहील. विशेष म्हणजे गर्भवती महिलेबाबत असा प्रकार पुन्हा झाल्यास प्रशासनाच्या विरोधात मनसे स्टाईलने ‘खळ-खट्याळ’ करेल अशा इशारा निवेदनाच्या माध्यमांतून पालिका आयुक बोडके यांना दिला. यावेळी डोंबिवली मनसे शहर अध्यक्ष मनोज घरत, उर्मिला तांबे, उल्हास भोईर आदी मनसे पदाधिकारी उपस्थित होते.