मुंबई : पूर्व द्रुतगती मार्गावर भरधाव मोटार कोलांटीउडी घेत खाडीमधील तिवरांच्या जंगलात पडल्याची घटना सोमवारी मध्यरात्री घडली. भांडूप पंपिंगजवळ चालकाचे मोटारीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला. यात चालक, त्याचे दोन मित्र यांना किरकोळ दुखापत झाली. नशीब बलवत्तर म्हणून ते वाचले. मोटारीचा मात्र चुराडा झाला. क्रेनच्या सहाय्याने मंगळवारी मोटार बाहेर काढण्यात आली.
ठाण्याकडून कुर्ल्याकडे स्कोडा मोटार गाडीने तिघे जात होते. रईस शेख (४२) या चालकासह त्याचे मित्र जगदीश गुप्ता आणि शकील अन्सारी (सर्व राहणार कुर्ला) प्रवास करत होते. भरधाव वेगात मोटार चालविणार्या रईसचा गाडीवरील ताबा सुटला आणि कोलांटीउडी घेत ती पदपथावरून उडून पडली.
याची माहिती महामार्गावरील वाहन चालकांनी पोलिसांना दिली. विक्रोळी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तिघांना कन्नमवार नगरमधील पालिकेच्या महात्मा फुले रुग्णालयात उपचारासाठी नेले. गंभीर दुखापत नसल्याने प्राथमिक उपचार करून त्यांना सोडण्यात आले. चालक रईसवर निष्काळजीपणाने गाडी चालविल्याने दंड आकारला.