मुंबई : मालवणमधील आडारी व झिरंगा नदीवर नवीन पूल बांधण्यासंदर्भातील कामे सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्यात येत आहेत. या पुलाच्या कामासंदर्भात तातडीने कामे व्हावीत यासाठी पाठपुरावा करण्यात येईल, असे ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी विधानसभेत सांगितले.
या संदर्भात सदस्य कालिदास कोळंबकर यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मुंडे बोलत होत्या. या चर्चेत वैभव नाईक यांनी सहभाग घेतला.
मुंडे म्हणाल्या की, आडारी नदीवरील पुलाच्या कामास सुधारित प्रशासकीय मान्यता देण्याची कार्यवाही सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सुरू आहे. झिरंगा नदीवरील नवीन पूल निधी व निकषाच्या अधिन राहून प्रस्तावित करण्याचा सार्वजनिक बांधकाम विभागाचा प्रयत्न आहे. कामात विलंब होताना आढळून आल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाशी समन्वय साधून ही कामे तातडीने पूर्ण करण्यासंदर्भात पाठपुरावा करू, असेही मुंडे यांनी सांगितले.
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेसाठी प्रत्येक तालुक्याचा आराखडा तयार असून, तालुक्याला निकषाप्रमाणे निधी मिळावा, अशी योजनेची रचना आहे. योजनेसंदर्भात सदस्यांच्या सूचनांचा विचार करण्यात येईल, असेही मुंडे यांनी सांगितले.