ठाणे : विधान परिषदेचे माजी उपसभापती वसंतराव डावखरे यांच्या पार्थिवावर शुक्रवारी जवाहरबाग स्मशानभूमीत शासकीय इतमामांत अंत्यसंस्कार करण्यात आले. स्मशानभूमीत त्यांचे पुत्र प्रबोध आणि आमदार निरंजन डावखरे यांनी विधिवत त्यांच्या पार्थिवास अग्नी दिला. पोलीस दलातील जवानांनी हवेत गोळीबाराच्या फैरी झाडून त्यांना अखेरची मानवंदना दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, पालकमंत्री एकनाथ शिंदे, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, जिल्हाधिकारी डॉ महेंद्र कल्याणकर, पोलीस आयुक्त परम बीर सिंग यांनी पुष्प वाहून त्यांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी अनेक राजकीय पक्षाचे नेते, कार्यकर्ते, ठाण्यातील आमदार, लोकप्रतिनिधी यांनी एकच गर्दी केली होती.
स्व. वसंतराव डावखरे यांचे पार्थिव शुक्रवारी सकाळी मुंबईहून ठाण्यातील हरिनिवास भागातील गिरीराज हाईट्स येथील त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आले. यानंतर त्यांची अंत्ययात्रा प्रमुख मार्गावरून निघून स्मशानभूमीत पोहोचली. स्मशानभूमीत उपस्थित मान्यवर व नेत्यांनी स्व. डावखरे यांच्याविषयीच्या आठवणीला उजाळा दिला तसेच आपल्या भावना व्यक्त केल्या. वसंतराव डावखरे हे अजातशत्रू आणि जगन्मित्र होते, त्यांच्या जाण्याने मोठी हानी झाली आहे. ते सभागृहातील कामकाज अतिशय कुशलतेने चालवीत. स्वत:च्या मनातील दु:ख त्यांनी कधी व्यक्त केले नाही. मात्र कायम हसऱ्या चेहऱ्याने राहिले. मी त्यांना अनेक वर्षे अगदी जवळून पाहिले असून त्यांच्याविषयी माझ्या खूप आठवणी आहेत, अशा भावना मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केल्या. विधानपरिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, पालकमंत्री एकनाथ शिंदे ही भावना व्यक्त आदरांजली वाहिली. तर माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी स्व. डावखरे यांचा दशक्रिया विधीचा कार्यक्रम १३ जानेवारीस शिरूर तालुक्यातील हिवरे गावी होणार असल्याचे आपल्या भाषणात सांगितले.