मुंबई, शुक्रवार (प्रतिनिधी)- कमला मिल कंपाऊंडमधील पबला ‘फायर ट्रिक्स’च्या खेळामुळे आग लागली. ज्वलनशील पदार्थावर ‘फ्लेम कॉकटेल’चे निखारे पडल्याने आग भडकली, अशी माहिती अग्निशमन दलाने केलेल्या चौकशी अहवालातून उघड केली आहे.
कमला मिलमध्ये लागलेली आग ही ‘फ्लेम कॉकटेल’चा खेळ सुरु असताना निखारे व उडणाऱ्या ठिणगींमुळे, कोळशाच्या शेगडीतून उडणा-या छोट्या पेटत्या कोळशांमुळे आणि ‘मोजोस्’मधील हुक्क्यामधील छोटे निखारेही पडदे आणि शोभिवंत वस्तूंवर पडल्यामुळे भडकली. त्याचवेळी जोरदार वारे वाहात असल्याने आणि खुल्या गच्चीमुळे आग झपाट्याने पसरली. दरम्यान आगीचा भडका उडाल्याने अग्निशमन यंत्रणा ही आग रोखू शकली नाही, असे मुंबई अग्निशमन दलाने या आगीच्या चौकशी अहवालात स्पष्ट नमूद केले आहे. न विझवलेल्या सिगारेट आणि कोळशाच्या शेगड्याही आढळून आल्या. आग लागली तेंव्हा दोन्ही ठिकाणी २०० ते ३०० लोक उपस्थित होते, असेही या अहवालात नमूद केले आहे.