मुंबई १२ मे – ही केवळ प्रधानमंत्री पदाचे निवडणूक नसून, हे संविधान वाचवण्याची व भारत देशात लोकशाही जिवंत ठेवण्याची लढाई असल्याचे सूचक विधान युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी केले. ईशान्य मुंबई लोकसभा शिवसेनेचे उमेदवार संजय दिना पाटील यांच्या प्रचारासाठी आज भांडुप येथे आयोजित सभेमध्ये बोलत होते. समोर उपस्थित असलेल्या प्रचंड समुदायाला मार्गदर्शन करताना आदित्य ठाकरे यांनी शिंदे आणि फडणवीस सरकारवर जोरदार हल्ला चढवला.
केंद्रातील मोदी सरकारला देशात चीन सारखी हुकूमशाही आणायची आहे असे त्यांनी सांगितले. गेले अडीच वर्षे राज्यातील शिंदे सरकारने या जनतेवर केलेल्या अन्यायाची परतफेड करण्यासाठी ही लढाई जिंकून आपल्याला सहाही खासदार दिल्लीत पाठवलेच पाहिजेत असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासारख्या स्वच्छ प्रतिमेच्या नेत्याला सूडबुद्धीनेच जेलमध्ये टाकण्याचे पाप केंद्र सरकारने केले परंतु कोर्टाने त्यांना जामीन मंजूर केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खुपसून गद्दारी केली होती. त्याची आठवण त्यांनी सर्व शिवसैनिकांना करून दिली. शिवसेना आणि भाजपची युती असताना नरेंद्र मोदी यांनी देखील शिवसेनेचे अशाच प्रकारे गद्दारी केली होती व युती तोडली होती आणि आता तेच नरेंद्र मोदी पुन्हा एकदा महायुतीत परत येण्याचे आवाहन करत आहेत याची त्यांनी खिल्ली उडवली. देशात नरेंद्र मोदी यांचे सरकार येत नाही असे पाहून त्यांनी पुन्हा एकदा द्वार शिवसेनेसाठी उघडली असल्याचा आरोप त्यांनी केला. गद्दारी करणाऱ्याना महाराष्ट्राचे पाणी दाखवू असा इशारा देखील ठाकरे यांनी दिला. पियुष गोयल यांनी मुंबई स्लम फ्री करण्याचा नारा दिला तो आम्हाला देखील मान्य आहे परंतु त्यामुळे हजारो मराठी कुटुंबे मुंबई बाहेर फेकली जातील असा आरोप केला.
भाजपाने महाराष्ट्रातील सगळे मोठे उद्योग गुजरातला पळवले परंतु सत्तेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्ली समोर सपशेल लोटांगण घातले. शिवसेनेने सत्तेत असताना जनतेच्या भल्याची असंख्य कामे केली ज्यात पाचशे फुटापर्यंतच्या घरांना प्रॉपर्टी टॅक्स मुक्त केले. जगातील सर्वात स्वस्त बस प्रवास हा मुंबईतील बेस्ट बस मधून होतो ज्याची सुरुवात शिवसेनेने केली होती परंतु हेच भाव आता शिंदे सरकारला वाढवायचे आहेत असा आरोप त्यांनी केला. अदानीला दिलेल्या वीज कंपन्यांचे भाव पुढच्या दहा दिवसात वाढणार असल्याचा इशारा देत त्यांनी जनतेच्या हितासाठी संजय दिना पाटील यांना जिंकवून दिल्लीत धाडण्याचे आवाहन उपस्थित कार्यकर्त्यांना केले.