मुंबई : भाजपाच्या माघारीनंतर मुंबईचा महापौर, उपमहापौर शिवसेनेचाच होणार यावर शिक्कामोर्तब झाले असले तरी कॉंग्रेसनेही उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. आज दोन्ही पक्षांकडून अर्ज दाखल केले गेले. शिवसेनेकडून महापौर पदासाठी प्रा. विश्वनाथ महाडेश्वर आणि उपमहापौरपदी हेमांगी वरळीकर यांनी तर कॉंग्रेसकडून विठ्ठल लोकरे आणि विन्नी डिसोझा यांनी अनुक्रमे नामांकन अर्ज केले.
प्रा. विश्वनाथ महाडेश्वर हे कट्टर शिवसैनिक मानले जातात. त्यांची ही नगरसेवकपदाची तिसरी टर्म आहे. त्यांनी शिक्षण समितीचे अध्यक्षपद भूषविले आहे. पाच वर्षे त्यांनी स्थायी समिती सदस्य पदही सांभाळले आहे. ३५ वर्षे ते शिवसेनेत असून पालिका निवडणुकीत वांद्रे पूर्व येथील प्रभाग क्रमांक ८७ मधून निवडून आले आहेत.