
प्रातींनिधिक
रत्नागिरी : दाभोळ कासव संवर्धन केंद्रात संगोपन करण्यात आलेल्या कासवाच्या ४० पिल्लांना सुरक्षितरीत्या समुद्रात सोडण्यात आले. ही कासवे ऑलिव्ह रिडले जातीची होती. समुद्र व निसर्ग याच्यात समतोल राखणारे अशी या कासवांची ओळख आहे. त्यांची तस्करीही मोठ्या प्रमाणावर केली जाते. त्यामुळे ते नामशेष होऊ नयेत, यासाठी वन विभागाने कासव संवर्धन मोहिम हाती घेतली आहे.
एकट्या रत्नागिरी जिल्ह्यात कासव संवर्धन मोहिमेंतर्गत कासवाची सुमारे ४० हजार अंडी वर्षाला संवर्धित केली आहेत. दापोली तालुक्यात असणार्या नऊ गावांमध्ये कासवांची ६५ घरटी सापडली, त्या सुमारे ७ हजार अंडी आढळली होती. सद्यस्थितीत ती कासव संवर्धन केंद्रात ठेवली आहेत. आतापर्यंत त्यातील ६०० पिल्ले समुद्रात झेपावली आहेत.
कोकणातील सर्वच समुद्र किनाऱ्यांवर अलिव्ह रिडले समुद्री कासव आढळते. त्यांच्या अंडींची तस्करी केली जात होती. आता या कासवांच्या संवर्धनाची जबाबदारी वन विभागाने घेतली आहे. त्यामुळे कासवांसह पर्यावरणाचे संरक्षण होत आहे. रत्नागिरीत मंडणगड , दापोली , गुहागर , संगमेश्वर , राजापूर , रत्नागिरी येथे कासव संवर्धन केंद्रे आहेत