रत्नागिरी,(आरकेजी) : रत्नागिरी नगर परिषदेच्या रत्नागिरी पर्यटन महोत्सवाभोवती वादाचे सावट निर्माण झाले आहे. विरोधी नगरसेवकांनी या महोत्सवावर बहिष्कार टाकल्यामुळेच वादाची ठिणगी पडली आहे.
राष्ट्रवादी, अपक्ष, भाजपा अशा एकूण १४ नगरसेवकांनी या पर्यटन महोत्सवावर बहिष्कार टाकला आहे. रत्नागिरीत पाणी, कचरा अशा मुलभुत सुविधांचा प्रश्न गंभीर असताना पर्यटन महोत्सवाचा घाट कशाला असा प्रश्न बहिष्कार टाकणाऱ्या नगरसेवकांनी उपस्थित केलाय.
या वादात स्थानिक आमदार उदय सामंत यांनीही उडी घेतली आहे. विरोधकांची मनधरणी करू, असे त्यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले. विरोधकांनी प्रत्येक कामात मांजरासारखं आडवं जाण्याची भूमिका बदलावी, असा टोलाही त्यांनी हाणला.
दरम्यान, विरोधकांची भूमिका पाहता आमदार उदय सामंत मनधरणी करण्यात यशस्वी होतात की नाही याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.