
रसायनी पाताळगंगा येथे जपानच्या कोयोकु व भारताच्या कॅम्लीन यांच्या संयुक्त नव्या उत्पादन केंद्राचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हस्ते झाले त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आमदार प्रशांत ठाकूर, आमदार मनोहर भोईर, जपानचे राजदूत केंग हिरामटसु, जिल्हाधिकारी शीतल तेली-उगले, कॅम्लीनचे अध्यक्ष दिलीप दांडेकर, उपाध्यक्ष श्रीराम दांडेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी नबूचिका डोई, उपाध्यक्ष कॅम्लीन यासूनरो कूरोडा, वरिष्ठ उपाध्यक्ष ताकूयो मोरीकावा आदि मान्यवर उपस्थित होते.
कॅम्लिनने १९३१ ला गिरगावात छोट्याशा शाई उद्योगाच्या रुपाने लावलेल्या छोट्याच्या रोपट्याचे रुपांतर आज आंतरराष्ट्रीय स्तरावरील लोकोद्योगात झाल्याचे पाहून आनंद वाटला. मराठी माणसाने मोठ्या विश्वासाने हा उभारलेला उद्योग आहे. आपण लहानपणापासून कॅम्लिनच्या सहवासात शिकलेलो आहोत याचाही मुख्यमंत्र्यांनी उल्लेख केला. तसेच येत्या सहा महिन्यात या कंपनीचा आणखी विस्तार होवो, अशा शुभेच्छा या संयुक्त प्रकल्पाला त्यांनी दिल्या.
जपानचे राजदूत केंग हिरामटसू
जपानचे राजदूत केंग हिरामटसू यांनी याप्रसंगी बोलताना आजचा हा प्रकल्प भारत आणि जपान या दोन देशासाठी अभिमानाचा असल्याचे सांगून यामुळे दोन्ही देशातीले मैत्रीपूर्ण संबंध अधिक वृद्धींगत होत आहेत असे म्हटले. कोयोकुचा हा आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्वात मोठा प्रकल्प असल्याची माहिती देऊन त्यांनी या प्रकल्पासाठी महाराष्ट्र शासनाने केलेल्या सहकार्याबद्दल आभार मानले. मेक इन इंडिया व मेक इन महाराष्ट्र या दोन्हीही महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या गुणवत्तेनुसार येथील उत्पादन होईल, असा विश्वास त्यांनी याप्रसंगी व्यक्त केला.
अध्यक्ष दिलीप दांडेकर यांनी आपल्या भाषणातून कंपनीच्या कार्यपद्धतीची थोडक्यात ओळख करुन दिली. तर प्रास्ताविकातून श्रीराम दांडेकर यांनी प्रकल्पा विषयक सविस्तर माहिती दिली. तसेच हा प्रकल्प प्रदुषण विरहित असून रोजगार निर्मितीसाठी महत्त्वाचा असल्याचे सांगितले.
याप्रसंगी प्रकल्प उभारणीत सहभागी असलेल्या प्रमुखांचा प्रातिनिधीक सत्कार मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमास उद्योग विश्वातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन सुधीर गाडगीळ यांनी केले.