रत्नागिरी, ( विशेष प्रतिनिधी) : महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाला एक संधी द्या, पाच वर्षात रत्नागिरीचा कायापालट करतो, सर्व चित्र बदलून टाकतो आणि तसं केलं नाही तर परत आमचा विचार करू नका, असं भावनिक आवाहन आज महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आणि खासदार नारायण राणे यांनी पक्षाच्या रत्नागिरी येथील जाहीर सभेत केलं. चिपळूण नंतर आज रत्नागिरीत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची जाहीर सभा झाली यावेळी खासदार नारायण राणे यांनी ध्येय -धोरणं सांगत शिवसेनेवर जोरदार टीका केली.
रत्नागिरीत सत्ता जिल्हा परिषदेवर शिवसेनेची सत्ता आहे. आमदार, खासदार त्यांचे आहेत मग विकास का होत नाही. आंबा बागायतदार, मच्छिमारांचे प्रश्न तसेच आहेत. निवडणुका जवळ आल्या की वचने द्यायची आणि ती पूर्ण करायची नाहीत. यात काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप यांच्यासह सत्तेत नसलेले मनसेचाही समावेश आहे. यामध्ये स्वाभिमान वेगळी धोरणे घेऊन पुढे येत आहे. शब्द देऊ तो पुर्ण करु, असे आमचे घोषवाक्य आहे. त्यावरच आम्ही आगामी निवडणुकीत पुढे जाणार आहोत, त्यामुळे आम्हाला एक संधी द्या असं आवाहन राणे यांनी जाहीर सभेत केलं.
शिवसेनेवर टिका
नारायण राणे यांनी शिवसेनेचा खरपूस समाचार घेतला. सत्तेत असून मुख्यमंत्री शिवसेनेला भेट देत नाहीत, मला मुख्यमंत्री तीन वेळा भेटतात मात्र यांच्या मंत्र्यांना मुख्यमंत्री एकदा सुद्धा भेटत नाही. त्यामुळे शिवसेनेची औकात ती काय? अशी उपहासात्मक टिका राणे यांनी केली. तशिवसेना सत्तेसाठी पैसा आणि पैशासाठी सत्ता हा एक कलमी कार्यक्रम अवलंबलत आहे. तसेच नाणार प्रकल्पावर यांनीच आधी सह्या केल्या, मग विरोधात गेले. चार वर्षे झाली अजून यांचे राजीनामे खिशात आहेत. सत्ता सोडण्याची यांच्यात हिंमत नाही अशी टीका राणे यांनी यावेळी केली.