रत्नागिरी, ( विशेष प्रतिनिधी) : मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी उद्या रत्नागिरी जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे. सकल मराठा समाजाने ‘जिल्हा बंद’ची हाक दिली आहे. बंदच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी सायंकाळी शहरातून संचलन केलं.
मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या तापला आहे. राज्यभर यावरून आंदोलनं होत आहेत. काही ठिकाणी या आंदोलनाला हिंसक वळण लागत आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांत रत्नागिरी जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये बंदची हाक देण्यात आली होती. हे बंद 100 टक्के यशस्वी झाले होते. त्यानंतर आज पुन्हा एकदा संपूर्ण जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे. बंद बाबत रत्नागिरी शहरातील मराठा मैदानावरील सभागृहात मंगळवारी माजी खासदार नीलेश राणे यांच्या उपस्थितीत बैठक झाली होती. यावेळी मराठा मंडळाचे कार्याध्यक्ष केशवराव इंदूलकर, प्रताप सावंत-देसाई, भाऊ देसाई, संतोष तावडे, सुनील साळवी, हरिश्चंंद्र देसाई, काकी नलावडे यांच्यासह मराठा समाजातील विविध मान्यवर यावेळी उपस्थित होते. या बैठकीत सर्वांनी हातात हात घालून बंद 100 टक्के यशस्वी करण्याचं ठरवण्यात आलं होतं.
या बंदला व्यापाऱ्यासहित रिक्षा व टेम्पो वाहतूक, विद्यार्थी वाहतूक, संघटनांनी या बंदला पाठींबा दिला आहे. या बंदला जिल्हाभरातील महिला बचत गट, विविध महिला संघटनानी या बंदला पाठींबा दिला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील माध्यमिक, प्राथमिक शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थी, विद्यार्थिनींना संस्थाप्रमुखकानी बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. रत्नागिरी नगर परिषदेचाही या बंदला पाठींबा असल्याचं नगराध्यक्ष राहुल पंडित यांनी सांगितलं आहे. बंद यशस्वीततेसाठी रत्नागिरी जिल्ह्यातील कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत. हा जिल्हा बंद शांतता भंग न होता कायदा व सुव्यवस्था राखून पार पाडावा असे आवाहन महाराष्ट्र सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले आहे