रत्नागिरी, (आरकेजी) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भीमा साखर कारखान्याच्या गळीत हंगाम शुभारंभाप्रसंगी जाहीर सभेमध्ये नाभिक समाजाबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे आज रत्नागिरीत त्यांचा जाहीर निषेध करण्यात आला. जिल्ह्यातील नाभिक समाजाने एकत्र येत जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढला.
यावेळी मुख्यमंत्र्यांच्या निषेधार्थ जोरदार घोषणा देण्यात आल्या. मुख्यमंत्र्यानी जाहीर सभेत नाभिक समाजाला अपशब्द वापरले. त्यामुळे मुख्यमंत्र्यानी जाहीर सभेतच नाभिक समाजाची माफी मागावी अशी मागणी समाजाने केली आहे. तसेच मुख्यमंत्री 27 तारखेला दापोलीत येत आहेत. यावेळी त्यांना काळे झेंडे दाखवून निषेध करण्यात येईल, अशी माहिती नाभिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष महादेव चव्हाण यांनी दिली.
मुख्यमंत्र्यानी माफी मागावी : आ. राजन साळवी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाभिक समाजाबद्दल जे वक्तव्य केलेलं आहे, त्यामुळे समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. आपण त्यांच्या वक्तव्याचा निषेध करत असून मुख्यमंत्र्यानी नाभिक समाजाची माफी मागावी अशी मागणी शिवसेना आमदार राजन साळवी यांनी केली आहे