मुंबई : पालिका मांड्यामधील गाळ्यांच्या खर्चाची वार्षिक तूट भरून काढण्यासाठी गाळ्यांच्या भाडे दरात १० टक्क्यांनी वाढ करण्याचा विचार निर्णय घेतला आहे. यामुळे हातावर पोट असणारे मच्छीविक्रेते आणि ठोक भाडे देणार्या गाळेधारकांना मोठा भुर्दंड सहन करावा लागणार आहे. प्रतिवर्षी १० टक्क्यांने वाढ करण्याचे प्रस्तावित आहे.
पालिकेच्या अंतर्गत ‘अ’, ‘ब’ आणि ‘क’ श्रेणीमध्ये शंभरावर मंडया आहेत. या मंडयांमधील गाळ्यांच्या भाड्यामध्ये १९९६ पासून भाडेवाढ झालेली नाही. गेल्या २१ वर्षांत भाडेवाढ झाली नसताना मंडयांचे परिरक्षण आणि व्यवस्थापनासाठी होणार्या खर्चात मात्र मोठी वाढ झाली आहे. मंडईतील गाळेधारकांना सोयीसुविधा देणे आणि मंडईचा मेंटेनन्स राखण्याठी २०१६-१७ वर्षात प्रशासनाला ४२,१४,८४९७८ इतका खर्च झाला. मात्र बाजार विभागाचे उत्पन्न १७,८०,७७४९० इतकेच आले. यामध्ये २४,३४,०७४८८ इतकी तूट आली. त्यामुळे उत्पन्न आणि खर्च यामध्ये समतोल राखण्यासाठी व आगामी काळात मंडयांमध्ये दर्जेदार सुविधा देण्यासाठी भाडेवाढ प्रस्तावित केल्याचे प्रशासनाने म्हटले आहे. यामध्ये मंडयांमधील गाळ्यांचे ‘मार्केटेबल व्हेज’, ‘मार्केटेबल नॉन व्हेज’ आणि ‘नॉन मार्केटेबल’ असे वर्गीकरण केले आहे. मंडईतील ‘मार्केटेबल’मधील व्हेज गाळ्यांचे सध्याचे ६ ते ८ रुपयांपर्यंत प्रतिचौरस फूट असणारे सध्याचे भाडे १४ रुपये प्रति चौ. फूट होणार आहे. तर नॉन व्हेज गाळ्यांसाठीचे ९ ते ७.५० रुपये प्रतिमहा असणारे भाडे आता १६ रुपये आणि ‘नॉन – मार्केटेबल’ गाळ्यांसाठीचे ७.५० रुपयांपासून १२.५० रुपये प्रति चौ. फूट असणारे भाडे आता २० रुपये प्रति चौ. फूट करण्यात येणार आहे, असे प्रस्तावात पालिकेने म्हटले आहे.