मुंबई, 26 ऑगस्ट : अरबी समुद्रात निर्माण झालेल्या “क्यार” व “महा” या दोन चक्रीवादळामुळे मच्छीमारांना मासेमारी न करता आल्यामुळे झालेल्या नुकसानीबद्दल 65 कोटी 17 लाख इतके विशेष सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. आर्थिक पॅकेजची घोषणा राज्याचे मत्स्यव्यवसायमंत्री अस्लम शेख यांनी केली आहे.
मंत्रीमंडळाच्या बुधवारी पार पडलेल्या बैठकीनंतर शेख माध्यमांशी बोलत होते. शेख म्हणाले की, क्यार व महा चक्रीवादळांमुळे सन2019-2020 च्या प्रमुख मासेमारी हंगामात (24 आॅक्टोबर 2019 ते 8 नोव्हेंबर 2019) वादळी हवामानामुळे मच्छीमारांना पुर्ण क्षमतेने मासेमारी करता न आल्याने मच्छीमारांना फार मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान सहन करावे लागले होते. राज्य सरकारने या पॅकेजद्वारे मच्छीमारांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे.
रापणकार संघाचे सभासद असणाऱ्यांना प्रति सभासद 10 हजार रुपये असे 4 हजार 171 सभासदांना 4 कोटी 17 लाख, बिगर यांत्रिक नौकाधारकांना प्रत्येकी 20 हजार प्रमाणे 1 हजार 564 नौकाधारकांना 3 कोटी 12 लाख 80 हजार, 1-2 सिलेंडर नौकाधारकांना प्रत्येकी 20 हजार रुपये प्रमाणे 4 हजार 641 जणांना 9 कोटी 28 लाख 20 हजार, 3-4 सिलेंडर नौकाधारकांना प्रत्येकी 30 हजार प्रमाणे 1 हजार 526 जणांना 4 कोटी 57 लाख 80 हजार, 6 सिलेंडर नौकाधारकांना प्रत्येकी 30 हजार रुपये प्रमाणे 7 हजार 671 जणांना 23 कोटी 1 लाख 30 हजार रुपये, लहान मासळी विक्रेता मच्छिमारांना 50 लि. क्षमतेच्या दोन शितपेटया पुरवठा प्रत्येकी 3 हजार प्रमाणे 35 हजार जणांना 21 कोटी रुपये देण्यात येतील. याचा लाभ 54 हजार 573 मच्छिमारांना मिळेल. हा लाभ त्यांच्या थेट बँक खात्यामध्ये (डीबीटी) जमा करण्यात येईल.