रत्नागिरी : रत्नागिरी येथे आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय क्लासिकल बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद रत्नागिरीच्या पाचव्या मानांकित सौरिश कशेळकर याने पटकावले. अखेरच्या निर्णायक फेरीत सौरिशने प्रथम मानांकित सिद्धांत सावंत याच्या विरुद्ध आक्रमक चाली रचित ३८ चालींमध्ये विजय संपादन केला व सहा गुणांसह निर्विवाद प्रथम स्थान मिळवले. अखेरच्या फेरीतील इतर एका चुरशीच्या डावात तृतीय मानांकित सोहम रुमडे याने यश खेर विरुद्धचा डाव जिंकत पाच गुणांसह उपविजेतेपदाला गवसणी घातली. सिद्धांत सावंत, यश गोगटे व राज नारकर यांनी प्रत्येकी साडे चार गुण मिळवीत अनुक्रमे तिसरा, चौथा व पाचवा क्रमांक पटकावला तर वरद पेठे चार गुणांसह सहावा आला. अनरेटेड खेळाडूंमध्ये यश खेर याने तर मुलींमध्ये निधी मुळ्ये हिने प्रथम स्थान प्राप्त केले. १५ वर्षांखालील वयोगटात गार्गी मयेकर, १३ वर्षांखालील वयोगटात वेद डोईफोडे, ११ वर्षांखालील वयोगटात शाल्व कारेकर, ०९ वर्षांखालील वयोगटात राघव पाध्ये तर ०७ वर्षांखालील वयोगटात शर्वील शहाणे यांनी प्रथम उत्तेजनार्थ पारितोषिके पटकावली. रत्नागिरीच्या राज नारकर याला मागील क्लासिकल स्पर्धेत सर्वोत्तम डाव खेळल्या बद्दल विशेष पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ डिलाइट इंडस्ट्रीजच्या सौ. उमा देवळे यांचे हस्ते पार पडला. या प्रसंगी बोलताना सौ. देवळे यांनी बुद्धिबळाचा खेळ परंपरागत ( क्लासिकल ) पद्धतीने खेळण्यास मुलांना प्रोत्साहन दिले व अशा स्पर्धा बुद्धिबळपटूंनी सतत खेळत रहाव्या असे आवाहन केले. रत्नागिरी जिल्हा विकास बुद्धिबळ कार्यक्रमांतर्गत आयोजित केलेली ही दुसरी क्लासिकल स्पर्धा होती. पारितोषिक वितरण प्रसंगी श्री. सौरभ देवळे, चैतन्य भिडे, स्पर्धेतील प्रमुख पंच विवेक सोहनी आदी मान्यवर उपस्थित होते.