देवगड : स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्था देवगड, जामसंडेवासीयांना सर्वोत्तम आर्थिक सेवा देऊन आपलेसे करेल, असे प्रतिपादन संस्थाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी केले. जामसंडे येथे गोगटे यांच्या स्वरूप बिल्डिंगमध्ये स्वरूपानंद पतसंस्थेच्या 16 व्या देवगड-जामसंडे शाखेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
शाखा उद्घाटनानिमित्त संस्थेने 9 टक्के व्याजाची विशेष ठेव योजना जाहीर केली. या योजनेला पहिल्या एक तासात उदंड प्रतिसाद मिळाला. पहिल्या तासात 10 लाख रुपयांच्या ठेवी यात जमा झाल्या. 21 नवीन खाती उद्घाटनाप्रसंगी सुरू झाली. जामसंडे परिसराचा विकास होण्याकरिता संस्थेने पाऊल उचलले आहे. स्वरूपानंद पतसंस्थेला राज्य शासनाचा सहकारभूषण पुरस्कार मिळाला आहे. संस्थेची वसुली 99.99 टक्के आहे. गरजू व्यावसायिकांना अर्थसाह्य देतानाच या शाखेमध्ये सोनेतारण कर्ज, गृहबांधणी कर्ज, प्रापंचिक अडचण कर्ज, एनईएफटी, आरटीजीएस सुविधा, पिग्मी योजना बचत खाते आदी सुविधा दिल्या जाणार आहेत, अशी माहिती अध्यक्ष अॅड. पटवर्धन यांनी दिली.
या कार्यक्रमाला संस्था उपाध्यक्ष माधव गोगटे, नंदकुमार घाटे, अॅड. प्रसाद करंदीकर, अॅड. अभिषेक गोगटे, उदय बापट, प्रकाश गोगटे, प्रा. सुरेश सोनटक्के, अभय बापट, अरुण सोमण, डॉ. मुकुल प्रभुदेसाई, महेश्वर लेले, मनोज पोकळे, पतसंस्थेचे संचालक जयप्रकाश पाखरे, प्रसाद जोशी, शरदचंद्र लेले, मधुरा गोगटे, तालुका व्यापारी संघाचे अध्यक्ष प्रसाद पारकर, भट आदी उपस्थित होते.