वैभव नाईकची किंमत वैभव नाईकच संपवत आहे
महायुतीचाच उमेदवार निवडून येईल
विनायक राऊत यांनी बाराशे लोकांना घेऊन फॉर्म भरायचा कार्यक्रम आटोपला
..महायुतीत जे काही ठरेल त्या पद्धतीने आम्ही पुढची पावलं उचलू – निलेश राणे
रत्नागिरी : वैभव नाईक यांच्यासारख्या रिकामटेकडा आमदार महाराष्ट्रात नाही अशी टीका भाजपा नेते, माजी खासदार निलेश राणे यांनी केली आहे. ते आज रत्नागिरीत बोलत होते. निलेश राणे यांनी आज रत्नागिरी शहरातील श्री राम मंदिरात जाऊन प्रभू रामाचं दर्शन घेतलं. त्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.
यावेळी आमदार वैभव नाईक यांनी राणे यांच्या उमेदवारीबाबत केलेल्या विधानाबाबत विचारलं असता, ते म्हणाले की वैभव नाईक मीडियाशी बोलायला नेहमी आतुर असतात, तुम्ही विचारलं नाही तरी प्रतिक्रिया देऊन जाणार. त्यांचं आता काही कामच उरलेलं नाही. कुडाळ-मालवण मतदारसंघ या माणसाने ओसाड पाडला. सांगण्यासारखा एक कारखाना उभा केला नाही. वैभव नाईकची किंमत वैभव नाईकच संपवत आहे, तशी पाहायला गेलं तर तशी काही किंमतच नाहीय त्यांना. वैभव नाईक काय बोलतात याला आम्ही काडीचीही किंमत देत नाही. वैभव नाईक हा अकलेनी शून्य माणूस आहे. विकासाचं काही कळत नाही. प्रशासन कळलं नाही, आमदारकी कळली नाही. आशा फालतू माणसाबाबत बोलणं म्हणजे टाईम वेस्ट अशी टीका निलेश राणे यांनी केली आहे.
महायुतीचाच उमेदवार निवडून येईल – निलेश राणे
नारायण राणे यांच्या प्रचारसभा सध्या सुरू आहेत, याबाबत निलेश राणे म्हणाले की, राणे साहेबांचा मतदारसंघात महिनाभर झंझावात सुरू आहे. राणे साहेबांच्या सभेला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे महायुतीचा उमेदवार निवडून येईल अशी परिस्थिती गावागावात आहे.
विनायक राऊत यांनी उमेदवारी अर्ज भरताना केलेल्या शक्तिप्रदर्शनाबाबत राणे म्हणाले की, शक्तिप्रदर्शन म्हणजे काय बाराशे लोक का? एक काळ होता शिवसेनेचा, ज्यावेळेला मैदान भरत होते, पण आता अंगण सुद्धा भरत नाही. विनायक राऊत यांचा उमेदवारी अर्ज भरताना अर्ध्या गाड्या या मुंबईतून आणल्या गेल्या होत्या. बाराशे लोकांना घेऊन त्यांनी फॉर्म भरायचा कार्यक्रम आटोपला अशी टीका निलेश राणे यांनी यावेळी केली.
दरम्यान महायुतीच्या उमेदवाराबाबत बोलताना निलेश राणे म्हणाले की, आम्ही महायुतीचा प्रचार करतोय, जेव्हा पक्षातून आदेश येतील आणि जसे आदेश येतील, तसेच महायुतीत जे काही ठरेल त्या पद्धतीने आम्ही पुढची पावलं उचलू.