रत्नागिरी : जिल्हा परिषदेच्या अतिधोकादायक असलेल्या ४१९ शाळांच्या दुरुस्तीला नुकतीच मान्यता मिळाली आहे. यामुळे शाळांच्या दुरुस्तीचा मार्ग मोकळा झाला आहे. दुरुस्ती कामांवर ७ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.सन २०१५-१६ या आर्थिक वर्षात ९७ शाळांची दुरुस्ती करण्यात आली होती. यासाठी १ कोटी १० लाख रुपयांचा निधी खर्ची पडला. सन २०१६-१७ मध्ये १०९ शाळांची दुरुस्ती करण्यात आली. यासाठी २ कोटी ४१ लाख ५० हजार रुपयांची तरतूद करण्यात आली होती. सन २०१७-१८ मध्ये गतवर्षीच्या तुलनेत शाळा दुरुस्तीचे दुपटीने प्रस्ताव दाखल झाले आहेत. त्यापैकी तातडीच्या अतिधोकादायक शाळांच्या दुरुस्तींना मंजुरी देण्यात आली. रत्नागिरी जिल्ह्यात अडीच हजार शाळा आहेत. यातील काही शाळा दुर्गम भागात आहेत. शाळांकडून दुरुस्तीचे प्रस्ताव मागवण्यात आले होते. शाळांनी पाठविलेल्या प्रस्तावामध्ये संरक्षण भिंत बांधणे, लाद्या बसविणे, वर्गखोल्या दुरुस्त करणे, छप्पर काम, नवीन वर्ग खोल्या बांधणे असे प्रस्ताव जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून प्राथमिक शाळेमार्फत पाठविण्यात आले आहेत. यावर्षी राजापूर तालुक्यातील सर्वाधिक ८१ शाळांच्या दुरुस्तीचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. तर रत्नागिरी ७८, लांजा ५३, संगमेश्वर ६९, मंडणगड १३, दापोली १७, खेड ३८, चिपळूण ४७ आणि गुहागरमधील २४ शाळांचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत.