रत्नागिरी (आरकेजी): जिल्हा परिषद इमारतीसह प्राथमिक शिक्षणाधिकार्यांच्या केबीनला गळती लागली असून यावर तात्काळ उपाययोजना करा, अशा सूचना सभापतींनी बांधकाम विभागाला दिल्या. इमारतीला लागलेल्या गळतीची बांधकाम व आरोग्य सभापती विनोद झगडे यांनी नुकतीच पाहणी केली.
सभापतीपदाचा पदभार स्विकारल्यानंतर दोनच दिवसात झगडे यांनी कामाला सुरुवात केली आहे. इमारतीला लागलेल्या गळतीची अधिकार्यांकडून माहिती घेतल्यानंतर झगडे यांनी इमारतीच्या टेरसची पाहणी केली. यापुर्वी बांधकाम विभागाकडून टेरेसवर पत्र्याची शेड उभारण्याचा प्रस्ताव ठेवला होता; परंतु वारा वेगवान असल्याने पावसाळ्यात पत्रे उडून जाण्याची शक्यता होती. त्यामुळे तो बारगळला. नव्याने प्रस्ताव तयार करुन गळती कशी काढता येईल याबाबत झगडे यांनी सूचना दिल्या आहेत. प्राथमिक शिक्षणाधिकारी कुल्लाळ यांच्या केबीनमध्ये पाऊस सुरु झाल्यानंतर गळती लागले. त्यांच्या खुर्चीच्या शेजारीच पाण्याची धार लागते. बांधकाम सभापतींनी पाहणी करत त्यांना पर्यायी खोली देता येईल का यावर विचारणा केली. तसेच केबीनमधील बसण्याची दिशा बदलण्याची सुचना यावेळी केली आहे.