ठाणे, (विएम): अमिगो एफ सी संघाने १६ वर्षांखालील गटात जेएमडी बॉईज संघाचा आणि १८ वर्ष गटात जोसेफ बॉईज संघाचा पराभव करत शिवस्वप्न फाऊंडेशन आणि लायकांस फुटबॉल अकादमी आयोजित युवासेना फुटबॉल चषक स्पर्धेत दुहेरी यश संपादन केले. १६ वर्ष गटाच्या अंतिम फेरीत विजेत्या अमिगो संघाने त्यांचा स्ट्रायकर प्रणय मोरेने शेवटच्या मिनिटांमध्ये केलेल्या निर्णायक गोलामुळे जोसेफ बॉईज संघावर ३-२ असा निसटता पराभव केला. या विजयात प्रणयच्या जोडीने सनी सिंगने प्रत्येकी एक गोल केला. जोसेफ संघाच्या डिफेंडरने केलेल्या स्वयंगोलामुळे अमिगो संघाच्या खात्यात तिसरा गोल जमा झाला. पराभूत संघाचे दोन्ही गोल शाकिब शेखने केले.
आपल्या दुहेरी यशावर शिक्कामोर्तब करताना अमिगो एफ सी संघाने जेएमडी बॉईज संघाचे आव्हान ३-१ असे परतवून लावले. या सामन्यात किनिष्ठ गटातील आक्रमक स्ट्रायकर प्रणय मोरेने दोन आणि प्रवीण पांडेने एक गोल केला. जेएमडी बॉईज संघाचा एकमेव गोल अतुलने केला. सुमारे ७५ हजार रुपयांची रोख बक्षिसे असलेल्या स्पर्धेत दोन्ही गटामध्ये प्रत्येकी २० संघ सहभागी झाले होते. ही स्पर्धा खेळवण्यासाठी युवासेनेचे पदाधिकारी स्वप्नील लांडगे आणि महेश ताहियलानी यांनी पुढाकार घेतला होता.