मुंबई, (निसार अली) : आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त 12 ऑगस्ट रोजी गोरेगाव पूर्वेतील सेंट पायस महाविद्यालयात युवा या सामाजिक संस्थेच्या वतीने आंतरराष्ट्रीय युवा दिवस साजरा करण्यात आला. आंतरराष्ट्रीय युवा दिवसाला युवा जल्लोष असे नाव देण्यात आले होते. या वेळीं मुंबईतील युवक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
दरम्यान, आंतरराष्ट्रीय युवा दिवसानिमित्त सकाळी आपापल्या विभागात सुरक्षित आणि हक्काचे मैदान दे घोषवाक्य घेऊन कबड्डी, खोखो, लगोरी अशा अनेक प्रकारचे परंपरागत खेळ खेळले गेले. युवकांनी युवकांसाठी असे सुरक्षित स्थळ किंवा मैदान तयार करणे व त्यावर आपला हक्क मिळवणे आणि ते मैदान सर्वांसाठी कोणत्याही खेळासाठी उपलब्ध करुन देणे असा या युवा दिवसाचा हेतू होता. दुपारी आंतरराष्ट्रीय युवा दिनी पॅनल डिस्कशन, पथनाट्य आणि बरच काही असे भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.
या कार्यक्रमासाठी युवाच्या टीम मधील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यानी कार्यक्रम उत्साहात व यशस्वी करण्यासाठी नियोजनबद्ध मेहनत केली होती. प्रमुख पाहुणे आमदार विद्या चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते निसार अली, युवा कार्यकर्ते बाळा, मोहन चव्हाण आखाडे, प्रतीक्षा थट्टे यांनी पॅनल डिस्कशनमध्ये सहभाग दिला व उपस्थित तरुणांच्या प्रश्नांचे उत्तर दिले.