रत्नागिरी : शिवसेनेची भाजपासोबत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत असलेली युती तुटली; हा निर्णय शिवसैनिकांसाठी खूप आनंददायी आहे, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांनी शिवसेनेला लगावला. ते रत्नागिरीत बोलत होते.
भाजपाच्या डोक्यात सत्तेची मस्ती गेली आहे, या पार्श्वभूमीवर युती तोडण्याचा शिवसेनेने घेतलेला निर्णय़ योग्यच आहे. मात्र, हा निर्णय खूप उशिरा घेतला गेला, असेही ते म्हणाले.
सेनेचे हात सध्या दगडाखाली आहेत. जोपर्यंत हे हात सुटत नाहीत तो पर्यत सेना सत्ता सोडणार नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. अंजनवेल आणि सावर्डे या दोन जिल्हा परिषद गटाच्या लोकांनीच मुलगा विक्रांत जाधव याला निवडणूक लढवण्याचा आग्रह धरला. त्यामुळेच तो दोन गटांतून निवडणूक लढवत आहे, असे जाधव यांनी स्पष्ट केले
रमेश कदम यांचा जीव चिपळूण नगर पालिकेच्या टक्केवारीत अडकला आहे, असा आरोप भास्कर जाधव यांनी केला. कदम हे भाजपाच्या वाटेवर आहेत, राष्ट्रवादीला याचा फटका बसेल का? असा प्रश्न पत्रकारांनी जाधव यांना विचारला, तेव्हा ते बोलत होते. कदम माझ्यावर टीका करतात, म्हणूनच प्रकाशझोतात येतात. विकासकामांमुळे ते चर्चेत आल्याचे कधी ऐकिवात नाही. चिपळूणच्या विकास व्हावा, असे त्यांना वाटत नाही. केवळ पालिकेतील टक्केवारी त्यांना हवी आहे, असे जाधव म्हणाले.