मुंबई : भारताला हजारो वर्षांची सामरिक दळण-वळण व व्यापाराची परंपरा लाभली आहे. अठराव्या शतकात मुंबईत जहाज बांधणी उद्योग आला व याठिकाणी भारतीयांनी अनेक व्यापारी व युद्धनौकांची निर्मिती केली. आज देखील माझगाव गोदी येथे युद्धनौका व पाणबुड्या तयार केल्या जातात. शहराचा हा समृद्ध वारसा जनतेपुढे यावा, या करीता मुंबई येथे सामरिक व जहाजबांधणी इतिहासाचे अत्याधुनिक संग्रहालय निर्माण करावे, अशी सूचना राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी आज केली.
वाढत्या लोकसंख्येमुळे मुंबई शहराच्या सार्वजनिक वाहतुक व्यवस्थेवर अतिरिक्त ताण पडला असून शहरात लवकरात लवकर जलवाहतूक सुरु व्हावी व यासंदर्भात सर्व संबंधितांनी सहकार्य करावे अशीही अपेक्षा राज्यपालांनी यावेळी व्यक्त केली.
५४ वा राष्ट्रीय सामरिक दिन तसेच मर्चंट नेव्ही सप्ताहाचे उद्घाटन राज्यपालांचे हस्ते सोमवारी (ता. ३) राजभवन येथे झाले त्याप्रसंगी ते बोलत होते. सामरिक व्यापार क्षेत्रात अनेक रोजगार, स्वयंरोजगार तसेच उद्योगाच्या संधी आहेत, परंतु बहुतांश विद्यार्थ्यांना व युवकांना त्याबद्दल पुरेशी माहिती नाही. या करीता सामरिक प्रशिक्षण संस्था तसेच विद्यापीठांमध्ये सहकार्य वाढवावे असे सांगतानाच सामरिक व्यापार व जहाज उद्योग या क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढावा अशीही अपेक्षा राज्यपालांनी यावेळी व्यक्त केली.
समुद्रात होणारी तेलगळती व त्यामुळे होणारी पर्यावरणाची हानी टाळण्याच्या दृष्टीने उपाय योजना केल्या जात असल्याची माहिती भारतीय जहाज महामंडळाच्या महासंचालिका डॉ मालिनी शंकर यांनी यावेळी दिली तर समुद्री चाचेगिरीच्या घटनांमध्ये गेल्या दोन वर्षात लक्षणीय घट झाल्याची माहिती अतिरिक्त महासंचालक अमिताभ कुमार यांनी यावेळी दिली