
नागपूर : महाराष्ट्र विधिमंडळाच्या ऐतिहासिक विधान भवनात 29 आणि 30 जुलै रोजी दोन दिवसीय ‘युथ पाइल लिमिट राष्ट्रीय युवा संसद 2025’ चे भव्य आयोजन करण्यात आले. देशभरातील जवळपास 150 युवक प्रतिनिधींच्या सहभागाने ही युवा संसद अत्यंत प्रेरणादायी ठरली.
या राष्ट्रीय युवा संसदचे उद्घाटन आमदार डॉ. आशीष देशमुख यांच्या हस्ते झाले. विद्यार्थ्यांनी साकारलेल्या या उपक्रमाचे त्यांनी विशेष कौतुक करताना सांगितले, विद्यार्थ्यांनी केवळ आयोजनच नव्हे, तर संसदेसारख्या शिस्तबद्ध प्रक्रियेतून संवाद साधण्याची कला आत्मसात केली आहे.
या युवा संसदेमध्ये उत्तर प्रदेश, पंजाब, कर्नाटक, गुजरात, महाराष्ट्र आदी विविध राज्यांमधून आलेल्या प्रतिनिधींनी भाग घेतला. समाजशास्त्र, लोकनीती, प्रशासन, पर्यावरण, शिक्षण आदी विषयांवर समित्यांमधून चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले. प्रत्यक्ष संसदीय कार्यपद्धतीचे अनुकरण करत प्रतिनिधींनी प्रश्नोत्तरांची सत्रे, धोरणे मांडणे आणि त्यावरील वादविवादाद्वारे विचारमंथन घडवले.
या संसदेमध्ये आमदार डॉ. परिणय फुके, माजी आमदार डॉ. गिरीश व्यास, पोलिस आयुक्त रवींद्र सिंघल, सेवानिवृत्त सनदी अधिकारी श्री. कनोजिया आदी मान्यवरांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी राजे मुधोजी भोसले आणि भोपाळ येथील मालवीय उद्योग समूहाचे डॉ. एल. एन. मालवीय प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
डॉ. मालवीय यांनी आपल्या भाषणात सांगितले, देशाच्या भविष्यासाठी सजग आणि विचारशील युवकांचे असे मंच तयार होणे ही काळाची गरज आहे. नागपूरसारख्या ठिकाणी हे घडत असल्याने प्रेरणा अधिकच वाढते.”
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनामध्ये विश्वजित रमेश चोपडे व देवयानी रमेश चोपडे यांच्या नेतृत्वाखाली रेहान अली, आर्यन कोरडे आणि एकूण 30 सदस्यीय युवा आयोजन समितीने महत्वाची भूमिका पार पाडली. समारोपप्रसंगी सहभागी प्रतिनिधींना प्रमाणपत्र देण्यात आले आणि विविध सत्रांतील उत्तम कामगिरी करणाऱ्या प्रतिनिधींना गौरविण्यात आले. आयोजक विश्वजित चोपडे यांनी सांगितले, युवा संसद हा उपक्रम युवकांना केवळ वक्तृत्व नाही तर नेतृत्वासाठी घडवत आहे. आम्ही ही चळवळ देशभर नेण्याचा संकल्प केला आहे.
‘युथ पाइल लिमिट’ ही उपक्रमशृंखला भारताच्या लोकशाही प्रक्रियेची नव्या पिढीमध्ये समज निर्माण करत असून विचार, संवाद आणि नेतृत्व यांच्याद्वारे नवभारताची पायाभरणी करणाऱ्या तरुणांना मंच उपलब्ध करून देत आहे.
















