लेखक : नवनाथ मोरे/प्रशांत गायकवाड
तरुणांना कम्युनिस्ट पक्षांच्या कार्याबद्दल माहिती नाही, ही वस्तुस्थिती आहे. प्रसार माध्यमेही जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याने या पक्षांचे काम तरुणांपर्यंत पोहोचत नाही. भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे या पलीकडे अन्य राजकीय पक्ष असल्याचा विसर प्रसारमाध्यमांना पडलाय. म्हणूनच आता तरुणांनी स्वतःहून देशप्रेमी कम्युनिस्ट पक्षांचे शेवटच्या घटकांपर्यंत असलेले काम जाणून घ्यायला हवे. तसेच या पक्षांच्या विविध संघटनांत काम करून राष्ट्र उभारणीच्या कार्यात सहभागी व्हायला हवे. देशात भारताचा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि भारतीय कम्युनिस्ट पक्ष हे दोन प्रमुख राजकीय पक्ष गणले जातात.
भांडवली व्यवस्था बळकट होत असली तरी कम्युनिस्ट पक्षांचा जोर वाढत आहे. गेल्या ५ वर्षांत कम्युनिस्टांनी जनतेच्या प्रश्नावर लक्ष्य वेधत नागरिकांना विधायक आंदोलनात रस्त्यावर उतरवले. जनआंदोलनाचा रेट इतका होता की सरकारला माघार घ्यावी लागली. त्यामध्ये भूमी अधिग्रहण कायदा असेल, वनाधिकार कायद्यातील दुरूस्ती असतील. परंतु, लोकसभा निवडणूक निकाल पाहता कम्युनिस्टांना समजण्यात जनता कमी पडली किंवा त्यांना कम्युनिस्ट पक्षांची धोरणे समजली नाहीत, असा अर्थ यातून निघू शकेल.
महाराष्ट्राचा विचार करता एकेकाळी आर्थिक राजधानी मुंबईत वर्चस्व असलेल्या कम्युनिस्टांना संपवण्याचा डाव कॉग्रेस आणि शिवसेनेने घातला. परंतु आजही कम्युनिस्ट चळवळ श्रमनगरी मुंबईत कार्यरत आहे. मुंबईमधील अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघातून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे के. नारायण निवडणूक रिंगणात आहेत. सध्या विधानसभा निवडणुकीसाठी या पक्षांचे उमेदवार उभे आहेत. जोमाने प्रचारही सुरू झालेत. मतमोजणीनंतर किती मते मिळाली हे समजेलच. तत्पूर्वी मतदारांसमोर जाताना हे पक्ष पारंपरिक मार्गाने जात आहेत. सोशल मीडियाचाही प्रभावी वापर केला जातोय, ही जमेची बाजू आहेच. सत्ताधारी पक्ष आणि विरोधक वृत्तपत्रात पानभर जाहिराती देतात. सातत्याने झळकणे हा मुख्य हेतू असतो. तसे कम्युनिस्ट पक्ष करत नाही. हाच तर इतर पक्ष आणि कम्युनिस्ट पक्षांमधील मुख्य फरक आहे. आपल्या कार्यातून, हुशारीतून लोकांत मिसळणे, खोटे न बोलणे आणि पक्ष वाढीसाठी कोणाच्याही लोकप्रियतेचा फायदा न घेणे हेच कम्युनिस्ट पक्षांचे धोरण राहिले आहे.
आज अनेक तरुणांना देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतलेले कम्युनिस्ट पक्ष माहीत नाहीत. पण कन्हैया कुमार माहीत आहे. तरूणांनी कम्युनिस्ट विचारधारा समजून घेण्याची गरज आहे. नेतृत्व लादायचे नाही तर तयार करून, लोकांनी स्वीकारायचे, या तत्वांशी कम्युनिस्ट पक्षांनी कधीही तडजोड केलेली नाही. मुळात डावे पक्ष लोकप्रियतेचा फायदा उचलत नाहीत, हे सांगणे आहे. कार्यकर्ते तयार करताना काय करावे, यासाठी डावे पक्ष परिश्रम घेतात. विद्यार्थी चळवळ, युवा संघटना, कामगार संघटना यात कार्य करणारेच पुढे कम्युनिस्ट नेते बनतात. त्यांची बौद्धिक क्षमता आणि लढाऊ वृत्ती तेथेच तयार होते. त्यामुळेच भांडवली आणि दलबदलू राजकर्त्यांना संघर्षशील डावे हाच सक्षम पर्याय असणार आहे.
तरुण वर्गाला राज्यकर्त्या वर्गाबद्दल संताप आहे. संतापाला तो दाबून टाकतो आहे. कारण समोर असणाऱ्या इतर नेत्यांवर त्याला विश्वास उरलेला नाही. वैचारिक पाया सक्षम नसेल तर योग्य दिशा मिळत नाही. हीच योग्य दिशा मिळण्यासाठी आणि धर्मनिरपेक्ष भारतासाठी काम करण्यासाठी तरुणांनी लोकशाहीवादी कम्युनिस्ट पक्षांना समजून घेणे गरजेचे बनले आहे.