मुंबई : सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले आणि त्यांच्या पत्नी शारदाताई बडोले यांच्या कवी मनातून साकारलेल्या ‘युगंधर’ अल्बममधून सामान्यांच्या सुख दु:खाच्या भावना व्यक्त झाल्या आहेत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केले.षण्मुखानंद सभागृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते युगंधर ऑडिओ अल्बमचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला त्यावेळी ते बोलत होते.यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, युगंधर अल्बमचे लोकार्पण करताना मला अतिशय आनंद होत आहे. ज्या व्यक्तीच्या मनात भावना असतात त्यालाच कविता सुचते. जे अनुभवले,शिकले तेच कवितेच्या माध्यमातून बाहेर येते. या अल्बममधून सामान्यांच्या सुख दुःखाच्या भावनाच बडोले दांपत्याने व्यक्त केल्या आहेत. या निमित्ताने आमच्यातील एका सुप्त कविची आज ओळख झाल्याचेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.या अल्बममधील गाण्यांना मनोरंजनासोबत शास्त्रीय बाज आहे. कवितांना सुंदर चाल व आवाज देऊन आपल्यासमोर आणल्याबद्दल गायकांचे मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केले. यावेळी या अल्बमचे यु ट्यूब चॅनेलवर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण झाले.युगंधर अल्बममध्ये एकूण नऊ गिते असून त्यातील सहा गिते शारदाताई बडोले यांनी शब्दबद्ध केली असून, तीन गिते राजकुमार बडोले यांची आहेत. या गीतांना संगीत साज चढविण्याचे काम भूपेश सवाई यांनी केले आहे. प्रसिद्ध गायक हरिहरन, शंकर महादेवन, बेला शेंडे, मधुश्री भट्टाचार्य, डॉ. अनिल खोब्रागडे, आदर्श शिंदे, प्रसेनजीत कोसंबी यांनी गीतांना आवाज दिला आहे.यावेळी आमदार सर्वश्री भाई गिरकर, सुरेश खाडे, मिलिंद माने, सुभाष साबणे, विजय रहांगडे, कालिदास कोळंबकर, सामाजिक न्याय विभागाचे सचिव दिनेश वाघमारे, गीतकार राम शंकर उपस्थित होते.