रत्नागिरी, प्रतिनिधी : पदवीनंतर लगेच मुंबईला वगैरे जाऊन नोकरीच्या मागे लागण्यापेक्षा सरकारी नोकरीतच करिअर करण्याचे ध्येय बाळगा. त्यासाठी योग्य मार्गदर्शनासह कष्ट करा आणि स्पर्धा परिक्षेला सामोरे जा, नक्कीच यश मिळेल असा विश्वास रत्नागिरी नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरविंद माळी यांनी शालेय विद्यार्थ्यांना केले. स्पर्धा परिक्षेेेची तयारी या विषयावर कार्यशाळा आयोजित केली होती, या प्रसंगी ते बोलत होते.
कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे यांच्या संकल्पनेतून समन्वय प्रतिष्ठान, रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालय व स्टडी सर्कल यांच्या विद्यमाने या कार्यशाळेचे नगर वाचन मंदिरात आयोजन करण्यात आले होते. शेकडो मुलांनी या कार्य़शाळेचा लाभ घेतला. कार्यक्रमाला आमदार निरंजन डावखरे, राष्ट्रवादी युवा नेते अजित यशवंतराव, रत्नागिरी जिल्हा कौशल्य विकास अधिकारी गणेश पिटोडे, स्टडी सर्कलचे राहुल पाटील, नगर वाचन मंदिराचे अध्यक्ष एड, दिपक पटवर्धन आदी उपस्थित होते. आनंद पाटणकर यांनी कार्यक्रमाचे सूत्र संचालन केले.
युपीएससी तसेच एमपीएससी अंतर्गत येत असलेल्या विविध सरकारी नोकरींसाठी अभ्यास कसा करावा, त्यासाठी कोणती तयारी करावी लागते, परिक्षेचे स्वरूप कसे असते, त्यासाठी काय अर्हता आहे अशा विविध विषयांची माहिती यावेळी मुलांना देण्यात आली. खाजगी नोकरीपेक्षा सरकारी नोकरीत कामाचे समाधान आहे, शासकीय धोरण ठरवण्यात, जनतेची सेवा करण्याच्या कामात आपला सहभाग असतो. सरकारी सेवेत जाण्यासाठी निव्वळ इच्छा बाळगून होणार नाही तर, निश्चित्त ध्येयाने अभ्यास करून कष्ट केले पाहिजे. योग्य मार्गदर्शन मिळाले तर, यश मिळणारच असे मत अरविंद माळी यांनी मांडले.
तर आमदार निरंजन डावखरे यांनी कोकणातील मुलांनी शासकीय सेवेत येण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. दिपक पटवर्धन यांनी कोकणातील मुलांमध्ये गुणवत्ता आहे. कष्ट करण्याची तयारी आहे फक्त त्यांना योग्य मार्गदर्शन वेळीच मिळायला हवे अशी खंत व्यक्त केली. अजित यशवंतराव यानी कोकणातील मुलांसाठी स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन केल्याबद्दल आमदार निरंजन डावखरे यांचे आभार मानले.