मुंबई : योग केवळ व्यायाम प्रकार नाही तर ती सुदृढ जीवन जगण्याची पद्धती आहे. योगामुळे निसर्गाकडून मानवाला ऊर्जा प्राप्त होते, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या शाळकरी मुलांसोबत विविध प्रकारची योगासने केली.
एन.एस.सी.आय. वरळी येथे दिव्याज फाऊंडेशनच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय योगदिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर अमृता फडणवीस, आमदार मंगलप्रभात लोढा, ज्येष्ठ अभिनेते जॅकी श्रॉफ, ज्येष्ठ समाजसेवक शांतीलाल मुथा, वल्लभ भन्साळी, योग तज्ज्ञ विकी महेता आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी योगाला आंतरराष्ट्रीय ओळख दिली आहे. प्रत्येकसंकटावर मात करण्याचे सामर्थ्य योगामध्ये आहे. त्यामुळे या योग पद्धतीचा सर्वांनी अवलंब करावा, असे आवाहन फडणवीस यांनी यावेळी केले. तर अभिनेते जॅकी श्रॉफ म्हणाले की, प्रत्येकाने स्वत:चे आरोग्य सांभाळावे त्याचे जतन करावे, योगद्वारेप्रत्येक व्यक्ती हे साध्य करु शकतो.
प्रास्ताविक शांतीलाल मुथा यांनी केले. यावेळी विद्यार्थ्यांसह अनेक नागरिक या योगदिनाच्या कार्यक्रमात उपस्थितहोते.