रत्नागिरी, (आरकेजी) : तिसरा आंतरराष्ट्रीय योग दिन आज रत्नागिरीत उत्साहात साजरा झाला. स्वामी रामदेव बाबा संचलित पतंजली योग समिती व परिवारातर्फे हॉटेल विवेकच्या हॉलमध्ये झालेल्या कार्यक्रमास रत्नागिरीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा व सत्र न्यायाधीश (वर्ग १) जे. पी. झपाटे यांनी केले.
षागार अधिकारी उत्तम सुर्वे, वैद्य आशुतोष गुर्जर, महिला पतंजलीच्या राज्य कार्यकारिणी सदस्य रमा जोग, पतंजलीचे प्रभारी शर्मा, पतंजली योग समितीचे अॅड. विद्यानंद जोग, भारत स्वाभीमान ट्रस्टचे संघटनमंत्री विनय साने, हॉटेल विवेकचे भाई देसाई, श्रीमान भागोजीशेठ कीर विधी महाविद्यालयाचे प्राचार्य अॅड. राजशेखर मलुष्टे उपस्थित होते.
या वेळी झपाटे यांनी सांगितले, भारतात अध्यात्मिक कालखंडामध्ये पतंजलींनी योग नावारूपाला आणला. सध्या रामदेवबाबांचे नाव चर्चेत आहे. योग आजचा एक दिवस नव्हे तर दररोज केला पाहिजे.
वैद्य गुर्जर यांनी योग व आयुर्वेद यावर मार्गदर्शन केले. अनंत आगाशे यांनी सूत्रसंचालन केले. योग दिनाच्या प्रोटोकॉलप्रमाणे अॅड. विद्यानंद जोग यांनी प्रार्थना, आसने, प्राणायाम, ध्यान यांचे मार्गदर्शन केले व सर्वांनी या प्रात्यक्षिकांमध्ये भाग घेतला.
रत्नागिरी जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्राअंतर्गत योगा शिकणार्या आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय पारितोषिके पटकावणार्या योगापटूंनी या वेळी विविध आसनांची प्रात्यक्षिके दाखवली. या वेळी जिल्हा क्रीडाधिकारी मिलींद दीक्षित, मार्गदर्शक रवीभूषण कुमठेकर उपस्थित होते.