मुंबई (रुपेश दळवी) : यकृत हा आपल्या शरिरातील अत्यंत महत्त्वाचा भाग. काही चुकीच्या पद्धती, औषधे किंवा किरकोळ आजारांकडे दुर्लक्ष केल्याने बऱ्याचदा एखादा मोठा आजार डोके वर काढतो. अशातच यकृताचा आजारही मोडतो. यकृत कर्करोग किंवा यकृत निकामी होणे हे सध्या अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत दिसून येते. अशाच काही रूग्णांना जीवनदान देण्याचं काम मुंबईतल्या जसलोक रूग्णालयात केले आहे. जसलोक मेदांता लिव्हर ट्रांसप्लांट प्रोग्रामची सुरूवात इथे झाली आहे. या प्रोग्राम अंतर्गत यकृताशी निगडीत रूग्णांना सर्व प्रकारच्या उपचार पद्धती उपलब्ध असणार आहेत. यकृतासंबंधी आजारांसाठी हे एक स्वतंत्र क्लिनिक आहे. या प्रोग्रामचे नेतृत्व जगातील प्रख्यात असलेले डॉ. अरविंदर सोईन करत आहेत. मेदांताचे वैशिष्ट्य म्हणजे इथे यकृत प्रत्यारोपणासाठी अवयव दान करणे अगदी सहज शक्य आहे. तसेच यकृत प्रत्यारोपण झालेल्यांनाही इथे उपचार घेता येतील.
नुकत्याचे झालेल्या एका पत्रकार परिषदेत डॉ. सोईन यांनी त्यांच्या काही रूग्णांबद्दल सांगितले. यात एका दोन वर्षाच्या चिमुरड्याचाही समावेश होता. या मुलाला हेपॅटोब्लास्टोमा हा आजार होता. हा यकृत कर्करोगाचा एक प्रकार आहे. यामुळे काही आठवड्यांमध्येच त्याचे यकृत निकामी झाले. व त्याचे यकृत प्रत्यारोपण करावे लागले. या मुलाचे यकृत प्रत्यारोपण करणे हे खऱ्या अर्थाने कठिण होते. कारण कर्करोगामुळे व केमोथेरपीमुळे त्याचे शरीर बऱ्याच प्रमाणात अशक्त झाले होते. तेव्हा शस्त्रक्रियेवेळी त्याचे निकामी यकृत व रक्तवाहिन्या वेगळे करणे हे जोखमीचे काम होते असे डॉ. सोईन यांनी सांगितले. विशेष म्हणजे या चिमुरड्याला त्याच्या वडिलांनी त्यांचे ३० टक्के यकृत दान केले आहे. शस्त्रक्रियेनंतर या मुलाला बऱ्याच काळ डॉक्टरांच्या निरीक्षणा अंतर्गत ठेवावे लागले. व पुढेही त्याचे बालपण व आरोग्य दोन्ही उत्तम राहावे यासाठी त्याच्या आरोग्यचाचण्या आम्ही करत आहोत, असे बालरोगतज्ज्ञ डॉ. निलम मोहन यांनी सांगितले. हेपॅटोब्लास्टोमा हा आजार १० लाखांमधील एका मुलाला होतो. याची दोन कारणे आहेत, पहिले म्हणजे अगदी कमी वजनाने वेळेच्या आधी बाळाचा जन्म होणे व दुसरे बाळाच्या शरिराच्या एकाच बाजूची वाढ जलदगतीने होणे. ओटीपोटाला सूज येणे, दुखणे, पाठदुखी, त्वचेला खाज येणे, डोळे पिवळे दिसणे, अजिर्ण होणे, वजन कमी होणे, उलट्या व ताप अशी या आजाराची लक्षणे आहेत. दुसरीकडे रूची अरोरा या ४५ वर्षीय महिलेने काही पर्यायी औषधांची निवड केल्याने व त्याचा दुष्परिणाम यकृतावर झाल्याने तिचे यकृत प्रत्यारोपण करावे लागले. पर्यायी औषधे घेतल्याने रूची यांच्या रक्तवाहिन्या अशुद्ध झाल्या व त्यांचे यकृत निकामी झाले. दुबईस्थित असलेल्या रूची यांनी डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतर त्यांचे जगण्याचे शाश्वती केवळ 10 टक्के असल्याचे कळताच त्यांनी लगेचच यकृत प्रत्यारोपण करायचे ठरविले. त्यामुळे कोणतेही औषध घेण्याआधी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक असल्याचे यातून निश्पन्न होते. रूची यांनाही त्यांच्या पतीकडून यकृताचा काही भाग दान करण्यात आला. अर्थात या दोन्ही शस्त्रक्रियांमध्ये यकृत दान करणाऱ्याला काहीही इजा नसल्याची खात्री केल्यानंतरच डॉ. सोईन यांनी त्या पार पाडल्या आहेत.
डॉ. अरविंदर यांनी केलेल्या शस्त्रक्रियांपैकी 95 टक्के शस्त्रक्रिया यशस्वी झाल्या आहेत. तसेच आतापर्यंत त्यांनी 2500 यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया केल्या आहेत. मात्र प्रत्येक शस्त्रक्रिया करताना ते आपली पहिलीच शस्त्रक्रिया असल्यासारखे समजतो असे यावेळी डॉ. सोईन यांनी आवर्जून सांगितले.