Mumbai : वरळी परिसरातील २ रस्त्यांच्या सिमेंट काँक्रिटीकरणाचा शुभारंभ राज्याचे पर्यावरण मंत्री तथा मुंबई उपनगरे जिल्हा पालकमंत्री श्री. आदित्य ठाकरे यांच्या हस्ते आज (दिनांक १४ ऑक्टोबर २०२१) शुभारंभ करण्यात आला.
याप्रसंगी खासदार श्री. राहुल शेवाळे, आमदार श्री. सदा सरवणकर, बेस्ट समितीचे अध्यक्ष श्री. आशिष चेंबूरकर, शिवसेना सचिव श्री. मिलिंद नार्वेकर, नगसेविका तथा माजी महापौर श्रीमती श्रद्धा जाधव, नगसेविका तथा माजी उप महापौर श्रीमती हेमांगी वरळीकर, नगरसेवक श्री. समाधान सरवणकर तसेच मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त श्री. एस. व्ही. आर. श्रीनिवास, जी/दक्षिण विभागाचे सहायक आयुक्त श्री. शरद उघडे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
पालकमंत्री श्री. आदित्य ठाकरे यांनी शुभारंभ केलेल्या २ रस्ते कामांमध्ये डॉ. ऍनी बेझंट मार्ग ते पांडुरंग बुधकर मार्ग आणि डॉ. ऍनी बेझंट मार्ग ते जगन्नाथ भातणकर मार्ग या २ रस्त्यांचा समावेश आहे.
डॉ. ऍनी बेझंट मार्ग ते पांडुरंग बुधकर मार्ग या रस्त्याची लांबी ४२० मीटर असून १२.२० मीटर रूंदीच्या होणाऱया या रस्त्यामुळे दळणवळण सुधारण्यास तसेच आजूबाजूला असणाऱया महत्वाच्या रस्त्यांवरील रहदारी कमी होण्यास वाव मिळेल.
डॉ. ऍनी बेझंट मार्ग ते जगन्नाथ भातणकर मार्ग या रस्त्याची लांबी सुमारे १.६ किलोमीटर आहे. २२.८० मीटर रूंदीच्या या रस्त्यामुळे लोअर परळ तसेच प्रभादेवी या भागातील रहदारी मोठ्या प्रमाणात कमी होण्यास वाव मिळेल.
दरम्यान, हिंदमातापासून वरळी कोळीवाड्यापर्यंत जाणाऱया टेक्सटाईल मील नाल्याचे कामगार नगर येथे रूंदीकरण, पुर्नरेखांकन करणे व संरक्षण भिंत बांधणे या कामाचा देखील श्री. ठाकरे यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला. हे काम पूर्णत्वास आल्यानंतर सदर परिसरातील पावसाळ्यातील संभाव्य पूर परिस्थिती नियंत्रणास मदत होईल, तसेच वरळी शिवडी उन्नत मार्ग विकसित करण्यासाठी एमएमआरडीएला गती देणे शक्य होईल.