
मुंबई : राज्यात ठाकरे सरकारच्या पुनश्च हरी ओम अर्थात मिशन बिगीन अगेनचा तिसरा टप्पा सुरू होताच मुंबईतील रेड झोन ठरलेल्या वरळी कोळीवाड्यातील महिलांनी अन्नपूर्णा महिला बचत गटाच्या माध्यमातून लॉक डाऊनवर मात करीत उद्योग भरारी घेतली आहे. राज्य सरकारने रेड झोन वगळता इतर ठिकाणी अनेक सेवा सूरु करण्याची परवानगी दिली आहे तर रेड झोन मधील महापालिकांमध्येही काही गोष्टी टप्याटप्याने सूरु करण्यात येणार आहेत. याच संधीचा फायदा घेत वरळी कोळीवाडा या भागातील महिलांनी एकत्र येऊन ग्रामीण प्रगती फाउंडेशनच्या सहकार्याने अन्नपूर्णा महिला बचत गटाच्या माध्यमातून उद्योग भरारी घेतली आहे.
ग्रामीण प्रगती फाउंडेशनच्या तांत्रिक प्रशिक्षण आणि आर्थिक सहकार्याने येथील महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून एकत्र येत लोणचे पापड निर्मितीस सुरुवात केली असून केवळ एका आठवड्यात प्रत्येकी 50 किलो पापड व लोणची तयार केली आहेत. त्याची विक्री करून आत्मनिर्भर भारत संकल्पनेनुसार आर्थिक स्वावलंबनाकडे वाटचाल केली आहे. यातुन किमान 30 महिलांना स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध झाली असून लोणचे पापड याचबरोबर कॉर्पोरेट कंपन्यांकरिता फॅन्सी मास्क निर्मिती, तसेच घरगुती वापराचे फिनाईल, अगरबत्ती, मेणबत्ती इ. बरोबरच रेडिमेड ब्लॉउज मेकिंगसारख्या अनेक उद्योगांचे नियोजन केले आहे. यातून येथील प्रत्येक महिला सदस्यांना आठवड्याला किमान 1500 ते 2000 हजार रुपये उत्पन्न मिळणार असल्याचे ग्रामीण प्रगती फाऊंडेशनचे मंगेश डफळे यांनी म्हटले आहे.
याबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, लॉकडाऊन मुळे मागील तीन महिन्यांपासून घरी असणाऱ्या या महिलांची आता येथील परिसरात लगबग सुरू झाली आहे. लॉकडाऊन मुळे अनेकांचे रोजगार बुडाले, अनेक हात बरोजगार झाले, तर हातावर पोट असणाऱ्या, धुणी भांडी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या अनेक महिलांसमोर आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला होता, या परिस्थितीत महिला स्वावलंबनाचा नारा दिला. स्त्रीने सक्षम व्हावे , उद्योजक व्हावे, उद्योगाचा वसा निर्भीडपणे उचलावा यासाठी ग्रामीण प्रगती फौंडेशनच्या वतीने येथील महिलांना एकत्र येण्याची हाक दिली. त्यांना अवगत असणाऱ्या कलागुण व तांत्रिक शिक्षणाचा विचार करून विविध उद्योगांचे नियोजन करीत त्याबाबत सर्वोतोपरी मोफत प्रशिक्षण आणि सहकार्य उपलब्ध करुन देत अन्नपूर्णा महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांकरिता अभ्यासक्रम व प्रशिक्षण केंद्र कार्यान्वित करण्यात आले असून त्या माध्यमातून शिवणकाम, विणकाम, जरी वर्क, आर्ट वर्क, आर्ट ऑन क्लॉथ इत्यादी मोफत व्यावसायिक प्रशिक्षण देण्यात येत असून लवकरच येथील महिलांना मोफत शिलाई मशिन्सचे वाटप करण्यात येणार आहे. त्या माध्यमातुन कॉर्पोरेट कंपन्यांकरिता फॅन्सी मास्कची निर्मोती करण्यात येणार असून बचत गटाच्या विविध उत्पादनांचा स्वतंत्र ब्रँड विकसित येणार आहे.














