नवी दिल्ली : केंद्रीय वाणिज्य, उद्योग आणि नागरी हवाई वाहतुक मंत्री सुरेश प्रभू यांनी काल नवी दिल्लीत जागतिक बँकेच्या चमूची भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली. व्यापार, प्रादेशिक एकात्मिक आणि गुंतवणूक वातावरण या विभागाच्या संचालक कॅरोलिन फ्रुएन्ड यांच्या नेतृत्वाखालील चमूमध्ये भारतासाठीचे संचालक जुनैद अहमद यांचा समावेश आहे. भारतात व्यापार, गुंतवणूक आणि सुविधांच्या क्षेत्रात होत असलेल्या विकासाला जागतिक बँकेचा आधार देण्यासाठी काय उपाय योजना करता येतील यावर या बैठकीत चर्चा झाली.
भारतात राष्ट्रीय एकात्मिक सुव्यवस्थित सुविधा धोरण राबवण्यासाठी वाणिज्य मंत्रालयाने केलेल्या कामांची माहिती मंत्र्यांनी यावेळी दिली. या धोरणाअंतर्गत भारतात माल साठवण्यासाठी गोदामे आणि इतर सुविधा वाढवल्या जात आहेत त्याशिवाय वाहतूक व्यवस्था आणि इतर पायाभूत सुविधा जिल्हा पातळीपासून तयार करण्यावर सरकारचा भर आहे. भारताचा निर्यात व्यापार 100 अब्ज डॉलर्सपर्यंत वाढवण्यासाठी काही विशिष्ट उत्पादने आणि बाजारपेठांची निवड करण्यात आली असून व्यापार वाढवण्याचे प्रयत्न सुरु असल्याचे प्रभू यांनी सांगितले.
भारतात सुव्यवस्थित सुविधा अधिक कार्यक्षम करण्यात येणारे अडथळे ओळखून ते दूर करण्यासाठी आणि भारतीय उत्पादने जागतिक मूल्यसाखळीशी जोडण्यासाठी जागतिक बँक आणि संबंधित मंत्रालये यांची एक संयुक्त कार्यशाळा घेतली जावी असा निर्णय या बैठकीत झाला